नांदेड : नांदेडसह हिंगोली जिल्ह्यात विविध ठिकाणी भूकंपाचे धक्के सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी बसले असून भूकंपाचे केंद्र हिंगोली जिल्ह्यातील पांगरा श

नांदेड : नांदेडसह हिंगोली जिल्ह्यात विविध ठिकाणी भूकंपाचे धक्के सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी बसले असून भूकंपाचे केंद्र हिंगोली जिल्ह्यातील पांगरा शिंदे असल्याचे सांगण्यात येत आहे. हिंगोली जिल्ह्यातील पांग्रा शिंदे परिसरात शनिवारी भूकंपाचे सौम्य ते मध्यम स्वरूपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 4.7 रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली असून त्याचे केंद्र पांग्रा शिंदे येथे असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली आहे.
भूकंपाची खोली सुमारे 10 किलोमीटर इतकी असल्यामुळे त्याचे धक्के आसपासच्या भागातही स्पष्टपणे जाणवले. सकाळच्या सुमारास अचानक जमिनीला कंप व हादरे जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक नागरिकांनी घराबाहेर धाव घेत सुरक्षित स्थळी आश्रय घेतला. या संदर्भात श्रीनिवास औंधकर, संचालक, एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल-अंतराळ विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांनी सांगितले की, हा भूकंप मध्यम तीव्रतेचा असून सध्या मोठ्या नुकसानीची शक्यता कमी आहे. मात्र, नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. भूकंपानंतरच्या हलक्या धक्क्यांची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक प्रशासनाने तत्काळ परिस्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केली असून, कोणतीही जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क करण्यात आली असून, नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, तज्ञांच्या मते 4.7 रिश्टर तीव्रतेचा भूकंप हा सहसा सौम्य ते मध्यम स्वरूपाचा मानला जातो. तरीही अशा घटनांमध्ये जुन्या किंवा कमकुवत बांधकामांना धोका संभवतो. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षिततेच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाकडून पुढील काही तास परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार असून, आवश्यकतेनुसार मदत व बचावकार्य तातडीने राबविण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

COMMENTS