मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक, परराष्ट्र आणि शैक्षणिक धोरणांवर तीव्र टीका करत

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक, परराष्ट्र आणि शैक्षणिक धोरणांवर तीव्र टीका करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. देशातील वाढती महागाई, रुपयाचे घसरते मूल्य, इंधन दरवाढ आणि स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहार यावरून त्यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले.
चव्हाण यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशासमोरील आर्थिक आव्हाने वाढली आहेत. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि पश्चिम आशियातील तणावामुळे महागाईचा दबाव वाढत असून त्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. स्वयंपाक गॅस आणि इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले असल्याचा आरोप त्यांनी केला. परराष्ट्र धोरणाबाबत बोलताना चव्हाण म्हणाले की, जागतिक पातळीवरील महत्त्वाच्या घडामोडींमध्ये भारताची भूमिका अधिक प्रभावीपणे दिसून यायला हवी होती. सध्याच्या परिस्थितीत भारताची राजनैतिक उपस्थिती अपेक्षित प्रमाणात जाणवत नसल्याची टीकाही त्यांनी केली. वैद्यकीय प्रवेशासाठी घेतल्या जाणार्या ‘नीट’ परीक्षेतील कथित गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. या प्रकरणात आतापर्यंत मोठ्या अधिकार्यांवर ठोस कारवाई झालेली दिसत नसल्याचे सांगत त्यांनी चौकशी अधिक व्यापक करण्याची मागणी केली. देशभरात वारंवार प्रश्नपत्रिका फुटीच्या घटना समोर येत असल्याने लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम होत आहे. काही आरोपींना अटक झाली असली तरी या गैरप्रकारामागील प्रमुख सूत्रधारांपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण यांचा उल्लेख करत नैतिक जबाबदारीचे महत्त्व अधोरेखित केले. प्रत्यक्ष चूक नसतानाही त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता, अशी आठवण करून देत सत्ताधार्यांनीही त्याच प्रकारची जबाबदारी दाखवावी, असे ते म्हणाले. सरकारने सध्याच्या परिस्थितीत आपल्या त्रुटी मान्य करून सुधारणा केल्या नाहीत, तर भविष्यात अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असा इशाराही पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला. ‘नीट’ प्रकरणातील प्रमुख दोषींवर कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा निर्माण करणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
श्वेतपत्रिका जाहीर करण्याची मागणी
सन 2011 पासून देशात झालेल्या प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनांचा संपूर्ण आढावा घेणारी श्वेतपत्रिका केंद्र सरकारने जाहीर करावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली. केवळ अधिकार्यांच्या बदल्या करून मूळ प्रश्न सुटणार नाही, असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित विषयात दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

COMMENTS