Homeताज्या बातम्या

प्रज्ञानंदचा ऐतिहासिक विक्रम; नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारा ठरला पहिला भारतीय

ओस्लो : भारतीय बुद्धिबळ विश्वाला अभिमानास्पद क्षण देत युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद याने प्रतिष्ठित अशा 'नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेचे' (Norway Che

म्हाडाच्या घरांच्या सोडतीला उत्स्फूर्त प्रतिसाद; २,६४० सदनिकांसाठी ७५ हजारांहून अधिक अर्ज
उन्नावमध्ये बस अपघातात ५ जणांचा मृत्यू; १५ हून अधिक प्रवासी जखमी
पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांचा बळी दिला; ॲड. प्रकाश आंबेडकरांची कडाडून टीका

ओस्लो : भारतीय बुद्धिबळ विश्वाला अभिमानास्पद क्षण देत युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद याने प्रतिष्ठित अशा ‘नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेचे’ (Norway Chess) विजेतेपद जिंकून इतिहास रचला आहे. अंतिम फेरीत जर्मनीच्या व्हिन्सेंट केमर याचा पराभव करत त्याने हे विजेतेपद मिळवले. या अत्यंत आव्हानात्मक स्पर्धेत अव्वल क्रमांक पटकावणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे.

अंतिम फेरीपूर्वी प्रज्ञानंद तिसऱ्या स्थानावर होता. मात्र, निर्णायक सामन्यात त्याने अत्यंत संयम, अचूक डावपेच आणि मानसिक स्थैर्याचे दर्शन घडवत विजय मिळवला. या यशामुळे त्याच्या खात्यात तीन गुणांची भर पडली आणि एकूण १८ गुणांसह त्याने स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले. या विजेतेपदाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, स्पर्धेदरम्यान त्याने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या मॅग्नस कार्लसन याला दोन वेळा पराभूत केले. जागतिक स्तरावरील अशा दिग्गज खेळाडूविरुद्ध मिळवलेले हे यश प्रज्ञानंदच्या प्रतिभेची आणि परिपक्वतेची साक्ष देणारे मानले जात आहे.

या स्पर्धेत भारताचा जागतिक विजेता डी. गुकेश हा देखील सहभागी झाला होता. मात्र, अंतिम टप्प्यात विजेतेपदाच्या शर्यतीतून तो बाहेर पडला. अशा परिस्थितीत भारताच्या अपेक्षेचे ओझे प्रज्ञानंदच्या खांद्यावर आले होते आणि त्याने त्या अपेक्षेला पूर्ण न्याय देत शानदार कामगिरी केली. स्पर्धेच्या सुरुवातीला त्याची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नव्हती व काही सामने बरोबरीत सुटल्याने तो गुणांच्या शर्यतीत मागे पडला होता. मात्र, पुढील फेऱ्यांमध्ये त्याने सातत्यपूर्ण आणि आक्रमक खेळ करत पुनरागमन केले व अखेर विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

दरम्यान, अमेरिकेचा ग्रँडमास्टर वेस्ली सो हा अपेक्षित आघाडी कायम राखू शकला नाही. त्याचा सामना बरोबरीत सुटल्याने निकाल टाय-ब्रेकरपर्यंत गेला आणि त्यामुळे स्पर्धेतील समीकरणे बदलली. या घडामोडींमुळे निर्माण झालेल्या संधीचा प्रज्ञानंदने अचूक फायदा घेत अंतिम फेरीतील विजयासह विजेतेपद आपल्या नावावर केले.

विश्वनाथन आनंद यांनाही ही स्पर्धा जिंकता आली नव्हती प्रज्ञानंदच्या या यशामुळे भारतीय बुद्धिबळाची जागतिक पातळीवरील ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. विशेष म्हणजे भारताचे माजी जागतिक विजेते विश्वनाथन आनंद यांनाही त्यांच्या कारकिर्दीत ही स्पर्धा जिंकता आली नव्हती. त्यामुळे प्रज्ञानंदचे हे यश अधिकच ऐतिहासिक आणि संस्मरणीय मानले जात आहे. भारतीय बुद्धिबळाच्या नव्या पिढीचे नेतृत्व करण्याची क्षमता प्रज्ञानंदमध्ये असल्याचे या विजयाने पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून, त्याच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

COMMENTS