मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर जोरदार टीका करत भारतीय शेतकऱ्यांच्या हिताकडे दु

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर जोरदार टीका करत भारतीय शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. भारत-अमेरिका व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अमेरिकन कृषी उत्पादनांना भारतीय बाजारपेठ खुली करण्याची भूमिका घेतल्यास त्याचा गंभीर परिणाम देशातील शेती आणि शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
ॲड. आंबेडकर यांनी सांगितले की, देशातील शेतकरी आधीच वाढता उत्पादन खर्च, हमीभावाचा अभाव, घटती निर्यात आणि कर्जबाजारीपणामुळे अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर अनुदान मिळणाऱ्या अमेरिकन कृषी उत्पादनांशी भारतीय शेतकऱ्यांना स्पर्धा करावी लागल्यास त्यांचे आर्थिक नुकसान अधिक वाढेल. महाराष्ट्रातील शेतीची परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगताना त्यांनी मागील दशकात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा मुद्दा उपस्थित केला.
दुष्काळ, वाढलेला खर्च, अपुरा बाजारभाव आणि इंधन टंचाईमुळे शेतकरी हतबल झाल्याचे ते म्हणाले. डिझेलच्या कमतरतेमुळे मशागतीची कामे अडचणीत येत असल्याने ग्रामीण भागात अस्वस्थता वाढत असल्याचेही त्यांनी नमूद केले. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे उदाहरण देत त्यांनी बाजारातील घसरलेल्या दरांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना कांद्याला अत्यंत कमी दर मिळत असल्याने शेतकरी कर्जाच्या दुष्टचक्रात अडकत असल्याचे सांगत, केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हितापेक्षा परकीय आर्थिक दबावाला प्राधान्य देत असल्याचा आरोप त्यांनी केला.

COMMENTS