नांदेड : देशभरात गाजलेल्या ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणाची चौकशी अद्याप सुरू असतानाच 21 जून रोजी होणार्या फेरपरीक्षेवरही संशयाचे सावट निर्माण झाले आहे.

नांदेड : देशभरात गाजलेल्या ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणाची चौकशी अद्याप सुरू असतानाच 21 जून रोजी होणार्या फेरपरीक्षेवरही संशयाचे सावट निर्माण झाले आहे. सोशल मीडियाच्या विविध माध्यमांवर फेरपरीक्षेच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याचे तसेच लाखो रुपये घेऊन हमखास उच्च गुण मिळवून देण्याचे आमिष दाखवले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नांदेडसह राज्यभरात या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू असून, पेपरफुटीशी संबंधित एजंटांचे रॅकेट पुन्हा सक्रिय झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नीट परीक्षेतील कथित गैरप्रकारांमुळे राष्ट्रीय स्तरावर मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर काही विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारकडून विशेष उपाययोजनांचा विचार सुरू असल्याची माहिती समोर येत असतानाच सोशल मीडियावर नव्याने सुरू झालेल्या संशयास्पद हालचालींनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. अहमदाबाद येथील सामाजिक कार्यकर्ते शुभम ठाकर यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, काही सोशल मीडिया चॅनेल्स आणि गुप्त गटांमध्ये फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका उपलब्ध असल्याचा दावा केला जात असून विद्यार्थी व पालकांकडून मोठ्या प्रमाणात पैशांची मागणी केली जात आहे. या चॅनेल्सकडे प्रत्यक्षात प्रश्नपत्रिका आहेत की नाहीत, हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी परीक्षेबाबत निर्माण झालेल्या भीतीचा गैरफायदा घेत आर्थिक फसवणूक केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, काही गटांकडून विद्यार्थ्यांना 620 किंवा त्याहून अधिक गुण मिळवून देण्याची हमी दिली जात असल्याचे समोर आले आहे. त्यासाठी 15 ते 20 लाख रुपयांपर्यंत रक्कम मागितली जात असल्याचेही तक्रारींमध्ये नमूद करण्यात आले आहे. अनेक पालकांच्या मोबाईलवर तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पेपर हवा असल्यास संपर्क करा, गॅरंटीड स्कोअर, टॉप रँक मिळवा अशा प्रकारचे संदेश येत असल्याची चर्चा नांदेडमध्येही रंगू लागली आहे. तक्रारीनुसार, काही संशयित ऑपरेटर स्वतःची ओळख लपवण्यासाठी वारंवार युझरनेम बदलत आहेत. संबंधित गटांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी ओळखीच्या व्यक्तींची शिफारस आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हे नेटवर्क अधिक संघटित स्वरूपात कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. एका राष्ट्रीय वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीने पालकाच्या भूमिकेतून अशाच एका ऑपरेटरशी संपर्क साधल्याचा दावा केला आहे. त्यावेळी संबंधित व्यक्तीने सुरुवातीला 50 हजार रुपये टोकन रक्कम भरण्याची अट घातली. त्यानंतर बंगळुरूमधील कार्यालयात प्रत्यक्ष भेट घेऊन उर्वरित रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले. एवढेच नव्हे तर परीक्षेच्या दिवशी उत्तरपत्रिका रिक्त ठेवण्याचा सल्ला देत, आमची संबंधित यंत्रणांशी सेटिंग आहे. नंतर योग्य उत्तरे भरून विद्यार्थ्याला 620 पेक्षा जास्त गुण मिळवून देऊ, असा दावा करण्यात आल्याचे सांगितले जाते. याशिवाय, दिल्लीस्थित एका नामांकित कोचिंग संस्थेशी संबंधित व्यक्तीनेही प्रश्नपत्रिका उपलब्ध असल्याचा दावा केल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्याने आपल्या नेटवर्कच्या माध्यमातून मोठ्या रकमेच्या व्यवहारांचा उल्लेख केल्याचे सांगितले जाते. काही प्रकरणांमध्ये ऑनलाइन व्यवहारांसाठी क्यूआर कोड पाठवून पैसे स्वीकारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही आरोप आहेत. या संपूर्ण प्रकरणामुळे नीट परीक्षेच्या विश्वासार्हतेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आधीच पेपरफुटीच्या आरोपांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली जात असताना आता फेरपरीक्षेलाही संशयाच्या भोवर्यात ओढले जात असल्याची भावना विद्यार्थी आणि पालकांमध्ये निर्माण झाली आहे. शैक्षणिक क्षेत्रातील जाणकारांच्या मते, अशा प्रकारच्या संदेशांवर विश्वास ठेवू नये. अनेकदा परीक्षा काळात फसवणूक करणारे गट विद्यार्थ्यांच्या मानसिक तणावाचा फायदा घेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार करतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या आमिषांना बळी न पडता अशा संदेशांची माहिती तत्काळ सायबर पोलिस किंवा संबंधित यंत्रणांना देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, 21 जून रोजी होणार्या फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि परीक्षा यंत्रणांनी प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षेसाठी अधिक कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विविध स्तरांतून पुढे येत आहे. विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर आणि गुणवत्तेवर आधारित असलेली परीक्षा प्रक्रिया पारदर्शक व विश्वासार्ह राहणे आवश्यक असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

COMMENTS