बीड : राज्यात अल्पसंख्याक संरक्षण कायदा लागू करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी तसेच आगामी जून महिन्यात होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेश


बीड : राज्यात अल्पसंख्याक संरक्षण कायदा लागू करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी तसेच आगामी जून महिन्यात होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान मुंबई येथील आझाद मैदानावर आयोजित करण्यात येणाऱ्या आंदोलनाच्या जनजागृतीसाठी अल्पसंख्याक संरक्षण संघर्ष समितीचा बीड जिल्हा दौरा यशस्वीरीत्या संपन्न झाला आहे. या दौऱ्यानंतर आता लवकरच राज्यव्यापी अभियानाची सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
प्रा. इलियास इनामदार यांच्या नेतृत्वाखाली तसेच मशवरा अमीर मुज्तबा अहमद खान आणि शेख मुसा यांच्या मार्गदर्शनाखाली समितीच्या शिष्टमंडळाने जिल्ह्यातील विविध शहरे आणि गावांमध्ये भेटी देऊन समाजप्रबोधन केले. समितीने आतापर्यंत गेवराई, माजलगाव, धारूर, परळी, अंबाजोगाई, नेकनूर, मांजरसुंबा, रायमोह, शिरूर, आष्टी आणि पाटोदा येथे कॉर्नर बैठकांचे आयोजन करून नागरिकांशी थेट संवाद साधला.
या बैठकींमध्ये देशभरात अल्पसंख्याक समाज, विशेषतः मुस्लिम समाजाविरोधात घडणारे जातीय हल्ले, मॉब लिंचिंग, हेट स्पीच, धार्मिक स्थळांचा अवमान, बुलडोझर कारवाया आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या द्वेषपूर्ण प्रचाराच्या घटनांवर सखोल चर्चा करण्यात आली. समाजात निर्माण झालेली असुरक्षिततेची भावना दूर करण्यासाठी आणि अन्याय-अत्याचार रोखण्यासाठी सर्वांनी घटनात्मक मार्गाने एकत्र येण्याची गरज असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संघर्ष समितीचे प्रा. शेख अमर, अॅड. जेबा शेख, अॅड. मोमीन अखिल, मुशीर इनामदार, शेख अखिल अण्णा, शेख मैनुद्दीन, पत्रकार पठाण अमरजान, सलीम खान यांच्यासह उपस्थित सर्व कार्यकर्ते व मान्यवरांनी केले.

COMMENTS