Homeताज्या बातम्या

विठ्ठलनामाच्या जयघोषात आ. बालाजी कल्याणकर यांचा सुरमयी वाढदिवस साजराशास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांच्या स्वरधारांनी नांदेडकर चिंब झाले, निसर्गालाही मोहित केले!

नांदेड : बरसणार्‍या पावसाच्या धारा, सभागृहात दुमदुमणारा विठ्ठल नामाचा जयघोष, स्वरसम्राट राहुल देशपांडे यांच्या कंठातून झरझर वाहणारे सूर आणि त्या

अशोक चव्हाण-अजित पवारांमध्ये ’गुफ्तगू’
अखेर अशोक चव्हाणांच्या हाती भाजपचा झेंंडा
मराठवाड्यातील सहकारी दूध संस्थांसोबत भागीदारीचा निर्णय ‘अमूल’ने घ्यावा; केंद्रीय दुग्धविकास मंत्र्यांचे स्पष्ट संकेत


नांदेड : बरसणार्‍या पावसाच्या धारा, सभागृहात दुमदुमणारा विठ्ठल नामाचा जयघोष, स्वरसम्राट राहुल देशपांडे यांच्या कंठातून झरझर वाहणारे सूर आणि त्या सुरांमध्ये पूर्णपणे तल्लीन झालेले हजारो रसिक… सोमवारी नांदेडमध्ये अनुभवायला मिळालेला हा क्षण म्हणजे जणू काही पंढरपूरचीच आषाढी वारी शहरात अवतरली होती. आमदार बालाजी कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेली ही भव्य संगीत मैफल नांदेडकरांसाठी अविस्मरणीय सांगितिक मेजवानी ठरली.
कार्यक्रमस्थळी संध्याकाळपासूनच रसिकांची प्रचंड गर्दी उसळली होती. शास्त्रीय संगीत, भावगीत, अभंग आणि नाट्यसंगीतावर प्रेम करणारे कानसेन, संगीत क्षेत्रातील मान्यवर, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी सभागृह अक्षरशः खचाखच भरून गेले होते. अनेकांना वाढदिवसानिमित्त आमदार बालाजी कल्याणकर यांचे अभिष्टचिंतन करण्याची इच्छा होती. मात्र, कल्याणकर यांनी स्वतःच विनम्र आवाहन करत, आज आपण सर्वजण खास पुण्याचे प्रख्यात गायक राहुल देशपांडे यांचे गायन ऐकण्यासाठी जमलो आहोत, असे सांगितल्याने कार्यक्रमाचे संपूर्ण केंद्रबिंदू राहुलजींचे कान तृप्त करणारे  संगीत बनले. नांदेड शहरातील सर्वच मार्गावरील रस्ते  गर्दीने भरून गेले होते. सायंकाळी सात वाजता  ए.के संभाजी मंगल कार्यालय व गार्डन च्या दिशेने हजारो नागरिक जात होते. या परिसरात सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडे -कोट ठेवण्यात आली होती. राहुल देशपांडे व त्यांच्या संचाने मैफलीची सुरुवात मागतो मी आता ’ या गणेशवंदनेने केली आणि पहिल्याच सुरात सभागृहाने टाळ्यांचा कडकडाट करत दाद दिली. त्यानंतर राहुल देशपांडे यांनी मानापमान नाटकातील ’रवी मी हा चंद्र कसा मग मिरवित असे लावीत पिसे’  हे कामोद रागातील नाट्यगीत जे खमाज थाटावर आधारित आहे. या गाण्यातून शृंगारिक व चंचल भावना व्यक्त  होते .रात्रीच्या पहिल्या प्रहरात हे गाणे गायले जाते. पंडित जितेंद्र अभिषेकी बुवांनी अजरामर केलेल्या ’कट्यार काळजात घुसली’ मधील  ’लागी कले जवा कटार’  हे नाट्य गीत सादर करून रसिकांना नाट्यसंगीताच्या सुवर्णकाळात काही काळ नेले. बगळ्यांची माळ फुले अजूनही अंबरात, सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या, पाणी पाणी रे पाणी यांसारखी भावस्पर्शी गीते त्यांनी आपल्या खास शैलीत सादर केली व उपस्थित तरुणाईला मन डोलावयाला लावली. प्रत्येक गाण्यानंतर उपस्थित रसिकांच्या टाळ्यांचा  उत्स्फूर्त कडकडाट होत होता. त्याचवेळी पावसाचे आगमन सुद्धा झाले व विजांचा कडकडाट चालू होता.भावगीत, भक्तीगीत, अभंग, नाट्यसंगीत आणि चित्रपट संगीताचा सुरेख संगम या मैफलीत अनुभवायला मिळाला. एकापेक्षा सरस अशी अनेक गीते त्यांनी गाऊन नांदेडकरांना मंत्रमुग्ध केले. दरम्यान, अचानक पावसाने जोरदार हजेरी लावली. सभागृहाबाहेर पावसाच्या सरी कोसळत होत्या. साऊंड सिस्टीमवरील बॉक्सवर अक्षरशः पाण्याच्या धारा बरसत होत्या. मात्र, एकही रसिक जागेवरून उठला नाही. उलट पावसाच्या साथीने संगीताची रंगत अधिकच वाढली. याच क्षणी राहुल देशपांडे यांनी विठ्ठलभक्तीचा स्वर लावला. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, अभिर गुलाल उधळीत रंग, कानडा राजा पंढरीचा यांसारख्या अभंगांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले. सूर, लय व ताल एकमेकांशी पूर्णपणे तादात्म्य पावले होते. संपूर्ण सभागृहातील वातावरण अध्यात्मिक झाले होते.   विठ्ठल नामाचा जयघोष एका विशिष्ट उंचीवर पोहोचला आणि सभागृहातील हजारो कंठ एकाच सुरात विठुरायाचे नामस्मरण करू लागले. त्या स्वरांचे तरंग जणू लाटांप्रमाणे प्रत्येक श्रोत्याच्या मनावर आदळत होते. अनेकांच्या अंगावर रोमांच उभे राहिले होते. क्षणभरासाठी नांदेडमध्येच पंढरी अवतरल्याचा भास निर्माण झाला. तबला, हार्मोनियम, गिटार, सिंथेसायझर आणि इतर वाद्यांची साथही तितकीच प्रभावी होती. प्रत्येक वाद्य जणू विठ्ठल नामाच्या जयघोषात सहभागी झाले होते. राहुल देशपांडे यांचा दमदार आणि भावपूर्ण आवाज या संगीतयात्रेचा आत्मा ठरला. मैफलीदरम्यान त्यांनी किशोर कुमार यांनी गायलेले शालिमार या चित्रपटातील  हम बेवफा हरगिज ना थे…. हे गाजलेले विरह गीतही सादर केले. तसेच माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या विशेष आग्रहावरून जशन ए बहारा मधील  कहने को जश्न ये बहारा है ,दिल ये देख के हैरों है हे गाणेही त्यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत सादर केले.  या संस्मरणीय कार्यक्रमास  खासदार अशोकराव चव्हाण, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, हरिद्रा महामंडळाचे अध्यक्ष आमदार हेमंत पाटील, विधान परिषदेचे माजी आमदार अमरनाथ राजूरकर, आशाताई शिंदे, आमदार बालाजी कल्याणकर, सौ संध्याताई कल्याणकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. स्वतः वाढदिवसाचे सत्कारमूर्ती असलेले आमदार बालाजी कल्याणकरही या सुरांच्या वर्षावात आणि विठ्ठल नामाच्या गजरात पूर्णपणे तल्लीन झाले होते.  कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ संगीत अभ्यासिका सीताभाभी, ज्येष्ठ लेखिका तथा कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर, आमदारांच्या मातोश्री सुभद्राताई कल्याणकर, माजी शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे, पंडित संजय जोशी, सूरमणी धनंजय जोशी, गोविंद गुरु आणि सौ. संध्याताई बालाजी कल्याणकर, आमदार बालाजी कल्याणकर व अन्य मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. रात्री उशिरापर्यंत सुरू राहिलेल्या या संगीत पर्वानंतरही रसिकांच्या चेहर्‍यावर समाधान आणि आनंद झळकत होता. बाहेर पाऊस कोसळत होता, आत सुरांचे वादळ घोंघावत होते आणि विठ्ठल नामाचा जयघोष आसमंतात घुमत होता. पावसाच्या धारा बरसत होत्या परंतु सभागृहातील एकही श्रोता जागेवरून हालला नाही. आमदार बालाजी कल्याणकर यांचा हा वाढदिवस केवळ राजकीय सोहळा न ठरता, नांदेडकरांच्या हृदयात कायमचा घर करणारा एक अविस्मरणीय सांस्कृतिक उत्सव ठरला. रात्री उशिरापर्यंत त्यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी शहरातील नागरिक, अधिकारी वर्ग, सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS