बीड : देशभरात गाजत असलेल्या नीट (नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट) घोटाळ्याचे पडसाद आता बीड जिल्ह्यातही उमटू लागले आहेत. या प्रकरणातील आरोपी

बीड : देशभरात गाजत असलेल्या नीट (नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट) घोटाळ्याचे पडसाद आता बीड जिल्ह्यातही उमटू लागले आहेत. या प्रकरणातील आरोपी म्हणून चर्चेत आलेल्या पी. व्ही. कुलकर्णी यांनी स्वतःच्या आलिशान इमारतीवरील अनधिकृत बांधकामावर बुलडोझर चालवल्याची घटना समोर आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. नगरपालिकेकडून होणार्या संभाव्य तोडक कारवाईचा धसका आणि मोठ्या दंडाच्या भीतीमुळे कुलकर्णी यांनी स्वतःहून बांधकाम पाडण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पी. व्ही. कुलकर्णी यांनी बीड शहरातील आपल्या वडिलोपार्जित घराच्या जागेवर अत्याधुनिक आणि भव्य इमारतीचे बांधकाम सुरू केले होते. शहरातील प्रमुख भागात उभारल्या जात असलेल्या या इमारतीकडे सुरुवातीपासूनच नागरिकांचे लक्ष होते. मात्र, नीट घोटाळ्याच्या तपासात त्यांचे नाव समोर आल्यानंतर या इमारतीच्या वैधतेबाबतही अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले. स्थानिक नागरिक आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून बांधकाम नियमांचे उल्लंघन झाल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे करण्यात आल्या होत्या. त्यानंतर बीड नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागासह बांधकाम शाखेने संबंधित जागेची पाहणी आणि अधिकृत मोजणी केली. या तपासणीदरम्यान मंजूर नकाशापेक्षा अधिक बांधकाम करण्यात आल्याचे तसेच नगररचना विभागाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्याची माहिती सूत्रांनी दिली. तपास अहवालानंतर नगरपालिकेने संबंधित बांधकामधारकाला नोटीस बजावत नियमबाह्य बांधकाम हटविण्याचे निर्देश दिले. अन्यथा पालिकेकडून थेट तोडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला होता. यानंतर कुलकर्णी यांनी स्वतःच्या इमारतीचा काही भाग पाडण्यास सुरुवात केली. बुलडोझरच्या साहाय्याने सुरू असलेल्या या कारवाईचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे, नीट घोटाळ्यामुळे आधीच चर्चेत असलेल्या कुलकर्णी यांच्यावरील अडचणी वाढत असताना आता अनधिकृत बांधकामाचा मुद्दाही समोर आल्याने त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. या प्रकरणामुळे शहरातील इतर अनधिकृत बांधकामधारकांमध्येही धास्ती निर्माण झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, बीड नगरपालिकेकडून शहरातील विविध बांधकामांची तपासणी सुरू असल्याची माहिती मिळत असून, नियमांचे उल्लंघन करणार्यांविरोधात कठोर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे आगामी काळात आणखी काही मोठ्या बांधकामांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नीट घोटाळ्याच्या तपासासोबतच संबंधित आरोपींच्या मालमत्ता, आर्थिक व्यवहार आणि इतर बाबींचीही चौकशी सुरू असल्याचे समजते. त्यामुळे या प्रकरणात पुढे आणखी कोणते धक्कादायक खुलासे होतात, याकडे बीडसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

COMMENTS