खरवंडी कासार : पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथील शेतकरी गणपत देवराव जगताप यांच्या शेतातील सौरऊर्जेवरील पंपाच्या एका पट्टीचे (सोलर पॅनेल) अज्

खरवंडी कासार : पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथील शेतकरी गणपत देवराव जगताप यांच्या शेतातील सौरऊर्जेवरील पंपाच्या एका पट्टीचे (सोलर पॅनेल) अज्ञात व्यक्तीने दगड मारून नुकसान केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे संबंधित शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून पंपाच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गणपत जगताप यांना ‘मागेल त्याला सौरऊर्जा पंप’ योजनेअंतर्गत साडेसात अश्वशक्ती (7.5 HP) क्षमतेचा सौरऊर्जेवरील पंप नुकताच विहिरीवर बसवून देण्यात आला होता. गुरुवारी (दि. २८ मे) शेतात पाहणी करत असताना सौरऊर्जा संचातील एका पट्टीची काच फुटल्याचे निदर्शनास आले. अज्ञात व्यक्तीने दगड मारून ही तोडफोड केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
पट्टीची काच फुटल्यामुळे पावसाळ्यात त्यामध्ये पाणी जाऊन विद्युत बिघाड होण्याचा व पंप बंद पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. पावसाळा तोंडावर असताना ही घटना घडल्याने शेतीच्या नियोजनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, संबंधित सौरऊर्जा पंपाची उभारणी करणाऱ्या कंपनीकडे घटनेची माहिती देण्यात आली आहे. पंपाच्या देखभाल, दुरुस्ती आणि विमा संरक्षणाची पाच वर्षांची तरतूद असल्याने नुकसानग्रस्त पट्टी तातडीने बदलून देण्याची मागणी शेतकऱ्याने केली आहे.

COMMENTS