देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील मोमीन आखाडा येथे आजोबांवर जीवघेणा गोळीबार करून फरार झालेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने अवघ

देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील मोमीन आखाडा येथे आजोबांवर जीवघेणा गोळीबार करून फरार झालेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने अवघ्या काही तासांत मुळा धरण परिसरातून ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून गावठी कट्टा, जिवंत काडतुसे आणि मोटारसायकलसह एकूण २ लाख ४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ मे रोजी सकाळी सहाच्या सुमारास दगडू गंगाराम कोहकडे (रा. मोमीन आखाडा, ता. राहुरी) यांच्यावर प्रवीण बाबासाहेब कोहकडे (वय २२) याने जुन्या वादातून गावठी कट्ट्यातून गोळीबार केला होता. फिर्यादीने यापूर्वी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केल्याचा राग मनात धरून हा जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता.
घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपीच्या शोधासाठी रवाना झाले होते. तपासादरम्यान आरोपी बारागाव नांदूर ते मुळा धरण परिसरात संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी विनानंबर मोटारसायकलवरून जाणाऱ्या प्रवीण कोहकडे याला ताब्यात घेतले.
त्याची झडती घेतली असता ३० हजार रुपयांचा गावठी कट्टा, ४ हजार रुपये किमतीची चार जिवंत काडतुसे, मोबाईल फोन, लेदर पाऊच आणि रिकाम्या पुंगळ्या जप्त करण्यात आल्या. आरोपीला पुढील तपासासाठी राहुरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

COMMENTS