कर्जत : शहरातील हॉटेल गौरव येथे काम करणाऱ्या वेटरचा (आचारी) मारहाण करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना पहाटेच्या सुमारास घडली. समीर अकबर शेख

कर्जत : शहरातील हॉटेल गौरव येथे काम करणाऱ्या वेटरचा (आचारी) मारहाण करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना पहाटेच्या सुमारास घडली. समीर अकबर शेख (वय २०, रा. जामगाव, ता. आष्टी) असे मृत युवकाचे नाव असून, या घटनेमुळे कर्जत शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, हॉटेलमध्ये कामाच्या कारणावरून वाद झाल्यानंतर समीर शेख याच्यावर तिघांनी जीवघेणा हल्ला केला. आरोपींनी लोखंडी कॉटवर त्याचे डोके जोरकसपणे आपटले आणि त्यानंतर काळ्या रंगाच्या कपड्याने गळा आवळून त्याचा खून केल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.
या प्रकरणातील संशयित आरोपी हे परप्रांतीय असून, राज हरिनाम गुप्ता (वय १८), दुखरन तिरथराज गौतम (वय १९) आणि मनोज मसुदिलाल गौतम (वय २४, सर्व रा. उत्तर प्रदेश) अशी त्यांची नावे आहेत. घटना घडल्यानंतर आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना कर्जत पोलिसांनी दौंड रेल्वे स्टेशन येथे सापळा रचून त्यांना तातडीने ताब्यात घेतले.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण लोखंडे आणि पोलीस निरीक्षक सोपानराव शिरसाट यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक शिरसाट यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत समीर शेख याच्यावर यापूर्वी गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल असून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमीही तपासली जात आहे. किरकोळ वादातून ही घटना घडल्याची शक्यता असली तरी खुनामागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस पुढील तपास करत आहेत.

COMMENTS