जामखेड : जामखेड शहरासह मोहा हद्दीतील अवैध कलाकेंद्रांवर कारवाई करण्यासाठी अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करूनही प्रशासनाने दखल घेतली नसल्या

जामखेड : जामखेड शहरासह मोहा हद्दीतील अवैध कलाकेंद्रांवर कारवाई करण्यासाठी अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करूनही प्रशासनाने दखल घेतली नसल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते सचिन आजबे यांनी तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
याबाबत तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात आजबे यांनी म्हटले आहे की, मोहा हद्दीतील कलाकेंद्रांमध्ये सुरू असलेल्या अवैध प्रकारांबाबत तसेच संबंधित मालकांच्या मनमानीविरोधात वारंवार निवेदने देण्यात आली. तहसीलदार, पोलीस निरीक्षक तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊनही केवळ आश्वासने मिळाली, मात्र कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. या कलाकेंद्रांमध्ये आसपासच्या जिल्ह्यांतील गुंड, सावकार आणि अवैध धंदे करणाऱ्यांचा वावर वाढला असून, येथे परप्रांतीय महिलांची पिळवणूक केली जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
या प्रकरणी ७ मे व १९ मे २०२६ रोजी तहसील कार्यालयाकडे लेखी अर्ज देऊनही प्रशासनाने कोणतीही हालचाल केली नाही. त्यामुळे मोहा हद्दीतील अवैध कलाकेंद्रे कायमस्वरूपी बंद करावीत, ध्वनिक्षेपकांचा (डीजे) बेकायदेशीर वापर थांबवावा, महिलांची ओळखपत्रे व कागदपत्रांची तपासणी करावी, शेतीच्या जागेवर सुरू असलेल्या आणि अग्निसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कलाकेंद्रांची चौकशी करावी, अशा विविध मागण्या त्यांनी केल्या आहेत.
या मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास पुढील दहा दिवसांत कोणत्याही क्षणी तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषणास बसणार असल्याचे आजबे यांनी निवेदनात नमूद केले आहे. या निवेदनाच्या प्रती राज्याचा गृह विभाग, सांस्कृतिक विभाग, पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि पोलीस महानिरीक्षक कार्यालयाकडे पाठविण्यात आल्या आहेत.

COMMENTS