कर्जत : तालुक्यातील होतकरू युवकांनी स्पर्धा परीक्षांमध्ये मिळविलेल्या उल्लेखनीय यशामुळे परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. केंद्रीय लोकस

कर्जत : तालुक्यातील होतकरू युवकांनी स्पर्धा परीक्षांमध्ये मिळविलेल्या उल्लेखनीय यशामुळे परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करणाऱ्या सारंग अस्वर तसेच सिडकोच्या परीक्षेत उत्तीर्ण होत ज्युनिअर प्लॅनर पदासाठी निवड झालेल्या गणेश अनारसे यांचा कर्जत (भांडेवाडी) येथील श्री संत सावता महाराज मंदिर परिसर विकास समितीच्या वतीने सत्कार करून गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक चंद्रकांत राऊत यांनी, “ग्रामीण भागातील बहुजन समाजातील गरजवंत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी योग्य सुविधा मिळणे आवश्यक आहे. सावता महाराज मंदिर परिसरात अद्ययावत अभ्यासिका व ग्रंथालय उभारल्यास अनेक विद्यार्थ्यांना त्याचा मोठा लाभ होईल,” असे प्रतिपादन केले.
सावता महाराज मंदिर परिसरात जागा उपलब्ध असून परिसराचे सुशोभीकरणही करण्यात आले आहे. त्यामुळे येथे आधुनिक अभ्यासिका व ग्रंथालय उभारण्याची गरज व्यक्त करण्यात आली. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशामुळे इतर तरुणांनाही प्रेरणा मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
यावेळी शरद मेहेत्रे, अशोक नेवसे, विशाल म्हेत्रे, राजकुमार चौरे आदींनीही मनोगत व्यक्त करून गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमास रामदास हजारे, गोदड सोनमाळी, रामदास फरांडे, रेवननाथ अभंग, सदाशिव फरांडे, राजेंद्र काळोखे, रवींद्र राऊत, जगन्नाथ शिंदे, धनंजय आगम, सुमित राऊत, विनायक भुजबळ, कैलास नेवसे, गोरख भोगे, सावता शिंदे आदी उपस्थित होते.

COMMENTS