नांदेड : नांदेड ग्रामीण पोलिसांनी अवैध जुगार व्यवसायाविरोधात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन क्रॅक डाऊन’ मोहिमेंतर्गत बुधवारी एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठि

नांदेड : नांदेड ग्रामीण पोलिसांनी अवैध जुगार व्यवसायाविरोधात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन क्रॅक डाऊन’ मोहिमेंतर्गत बुधवारी एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी धडक कारवाई करत 17 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन, मोटारसायकली तसेच जुगार साहित्य असा एकूण 6 लाख 40 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत असून, त्याअंतर्गत नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने 13 मे रोजी संयुक्त कारवाई केली. पहिली कारवाई गोपाळचावडी परिसरात करण्यात आली. येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकत काही आरोपींना रंगेहाथ पकडले, तर तिघेजण घटनास्थळावरून फरार झाले. या ठिकाणाहून रोख रक्कम, मोबाईल फोन आणि मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. त्यानंतर विष्णुपुरी परिसरातील वेद बारच्या मागील भागात दुसरी धाड टाकण्यात आली. येथेही पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले असून, दोन आरोपी पसार झाल्याची माहिती देण्यात आली.
तिसरी कारवाई मुजामपेठ येथे करण्यात आली. या ठिकाणी चार जणांना जुगार खेळताना पकडण्यात आले. त्यांच्याकडून जुगार साहित्य, रोख रक्कम, मोबाईल फोन आणि दुचाकी जप्त करण्यात आली. दरम्यान, 1 मेपासून सुरू करण्यात आलेल्या ‘ऑपरेशन क्रॅक डाऊन’ मोहिमेत आतापर्यंत 12 गुन्हे नोंदवून तब्बल 50 आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान आतापर्यंत 18 लाख 57 हजार 990 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी संबंधित अधिकारी व कर्मचार्यांचे अभिनंदन केले.

COMMENTS