दुर्मीळ जंगली सुरण वनौषधीमध्ये गणरायाचे दर्शन

Homeमहाराष्ट्रसातारा

दुर्मीळ जंगली सुरण वनौषधीमध्ये गणरायाचे दर्शन

पाटण येथे जंगली सुरण तथा एलिफंट याम फूट ही दुर्मिळ वनौषधी आढळून आली आहे. विविध आजारांवर गुणकारी ठरणार्‍या या वनस्पतीचे फुल विविध आकारात फुलते.

लॉटरीतून मिळणार गरीब मुलांना मोफत शाळा प्रवेश
कुमार जगताप यांना जीवे मारण्याची धमकी ; कुळधरणमधील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
मंत्रिपदाच्या चढाओढीतून शिंदे गटाचे दोन आमदार भिडले


पाटण / प्रतिनिधी : पाटण येथे जंगली सुरण तथा एलिफंट याम फूट ही दुर्मिळ वनौषधी आढळून आली आहे. विविध आजारांवर गुणकारी ठरणार्‍या या वनस्पतीचे फुल विविध आकारात फुलते. साधारणतः मासांप्रमाणे याचा आकार व रंग असतो. येथे फुललेल्या याच फुलाला गणपती मुर्तीसारखा आकार प्राप्त झाला आहे. भारतीय औषधात याचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याची माहिती मानद वन्यजीव रक्षक व पक्षी, प्राणी व वनस्पती अभ्यासक रोहन भाटे यांनी दिली.

या वनौषधीबाबत माहीती देताना रोहन भाटे पुढे म्हणाले, ही औषधी वनस्पती असून त्याचे शास्त्रीय नाव अमोरफ्लोफलास पाईओनीयफोलिस असे आहे. मराठीमध्ये त्याला जंगली सुरण असे संबोधले जाते. याला इंग्रजीत एलिफंट याम फूट असे म्हणतात. या वनस्पतीला साधारणतः मे ते जून महिन्यात फुले येते. या फुलाचा वास हा पहिल्या काही तासात अतिशय घाण येत असल्यामुळे त्याच्या जवळ जाणे काहीसे कठीण बनते. ही वनस्पती केवळ प्रौढ असतानाच फुलते दरवर्षी त्याला फुले येतीलच असे नाही. हे फुल साधारणपणे पाच ते सहा दिवस टिकते. उष्णता निर्माण करणारी ही वनौषधी असून त्याचा गंध, फुलांचे पराग कण किड्यांना आकर्षित करतात. हे फुल सर्वांचे लक्ष आकर्षित करून घेते. या फुलाची विविध आकारात निर्मिती होते. मध्यभागी चॉकलेटी रंगाचे मासांच्या आकार व रंगाचे ओबड-धोबड असे हे फुल असते. ही वनस्पती एखाद्या छोट्या झाडाप्रमाणे दिसते. हा मांसल भाग पाच ते सहा दिवसांनी मरून गेल्यावर तेथे हिरव्या रंगाचे पान येते तेही एखाद्या लहान झाडासारखे दिसते. भारतात या जातीचे पिक मुख्यतः बिहार, पश्‍चिम बंगाल, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, ओरिसा या राज्यात घेतले जाते. या वनौषधीचा वापर भारतीय औषधशास्त्रात मोठ्या प्रमाणावर केला जातो. आयुर्वेद, सिध्द युनानी या तिन्ही औषधी प्रणालीमध्ये याचा वापर केला जातो.

ब्रॉन्कायटीस, दमा, ओटीपोटात वेदना, उलट्या, जुलाब, प्लिहाचे विस्तार, मूळव्याध, हत्तीरोग, विकृत रक्तामुळे होणारे आणि संधिवात सुज यासाठी याचा वापर केला जातो. औषधीय अभ्यासामध्ये या वनौषधीचे विविध प्रकारचे प्रभाव दर्शविले गेले आहेत. या व्यतिरिक्त अ‍ॅन्टीबायोटिक्सचा वापर करताना बॅक्टेरियाची क्रिया कमी करण्यासाठी ही वनस्पती सामर्थ्यवान असल्याचेही आढळून आले आहे. हत्तीपाय रोगावर या वनस्पती कंदाचा फार गुणकारी व प्रभावी इलाज होत असल्यानेच याला इंग्रजीत एलिफंट याम फूट नावाने ओळखले जाते, असेही शेवटी रोहन भाटे यांनी सांगितले.

COMMENTS