अहिल्यानगर : जिल्ह्यात जबरी चोरी व सोनसाखळी हिसकावण्याच्या घटना घडवणार्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून, त्या

अहिल्यानगर : जिल्ह्यात जबरी चोरी व सोनसाखळी हिसकावण्याच्या घटना घडवणार्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल 10 गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी संशयितांकडून सुमारे 11 लाख 19 हजार 800 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ताराबाई मुरलीधर कोकाटे या शेतात काम करत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे 78 हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून नेले होते. यासंदर्भात त्यांनी 21 एप्रिल रोजी दिलेल्या फिर्यादीवरून अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते. पथकाने घटनास्थळी भेट देऊन तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान हा गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार गणेश दिवानजी काळे (रा. वाकोडी, ता. अहिल्यानगर) याने साथीदारांसह केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तो साथीदारांसह अहिल्यानगर-सोलापूर रस्त्यावरील वाकोडी गावाजवळील जुन्या जकात नाक्यावर दोन दुचाकींसह येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली.
यानंतर पोलिसांनी सापळा रचून संबंधित ठिकाणी छापा टाकला. पोलिसांना पाहताच संशयित पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून तिघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी आपली नावे गणेश दिवानजी काळे (वय 28), विनय उर्फ टकल्या योगेश काळे (वय 19, रा. वाळुंज, ता. अहिल्यानगर) आणि रोहित लल्या भोसले (वय 23, रा. सराटी वडगाव, ता. आष्टी, जि. बीड) अशी सांगितली. सखोल चौकशीत आणखी दोन साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली त्यांनी दिली. पोलिसांनी संशयित आरोपींकडून चोरीतील 102 ग्रॅम वजनाचे सुमारे 9 लाख 4 हजार 800 रूपये किमतीचे सोन्याचे दागिने, 45 हजार रूपये किमतीचे तीन मोबाईल आणि एक लाख 70 हजार रूपये किमतीच्या दोन दुचाकी असा एकूण 11 लाख 19 हजार 800 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

COMMENTS