गुरुग्राम : पंजाब सरकारमधील मंत्री आणि लुधियाना पश्चिम मतदारसंघाचे आमदार संजीव अरोरा यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनाल

गुरुग्राम : पंजाब सरकारमधील मंत्री आणि लुधियाना पश्चिम मतदारसंघाचे आमदार संजीव अरोरा यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठी कारवाई केली आहे. शनिवारी दिवसभर चाललेल्या धाडसत्रानंतर अरोरा यांना चंदीगडमधून ताब्यात घेण्यात आले. रविवारी सकाळी त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना सात दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.
या कारवाईनंतर पंजाबच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून अरोरा यांच्यावर गंभीर आर्थिक अनियमिततेचे आरोप करण्यात आले आहेत. अंमलबजावणी संचालनालयाकडून सध्या गुरुग्राम येथील कार्यालयात त्यांची कसून चौकशी सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजीव अरोरा आणि त्यांच्याशी संबंधित काही कंपन्यांवर सुमारे १५७ कोटी रुपयांच्या बनावट व्यवहारांचा आरोप आहे.
तपास यंत्रणेला प्राथमिक चौकशीत काही कंपन्यांच्या माध्यमातून खोटे व्यवहार दाखवण्यात आल्याचे आढळले आहे. तसेच कागदोपत्री कंपन्यांच्या साहाय्याने बनावट निर्यात दाखवून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार केल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे. ईडीने शनिवारी चंदीगड आणि गुरुग्राम येथील विविध ठिकाणी एकाच वेळी धाडी टाकल्या होत्या. सुमारे दहा तास चाललेल्या तपास आणि चौकशीनंतर सायंकाळी अरोरा यांना अटक करण्यात आली.
या प्रकरणात आणखी काही व्यक्ती आणि कंपन्यांची नावे समोर येण्याची शक्यता तपास यंत्रणेकडून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, विरोधी पक्षांनी या प्रकरणावरून पंजाब सरकारवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे, अरोरा यांच्या समर्थकांनी त्यांच्यावरील आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा केला आहे.

COMMENTS