चेन्नई : तामिळनाडूतील सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला असून अभिनेता थलपती विजय यांच्या पक्षाला अखेर आवश्यक पाठिंबा मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.

चेन्नई : तामिळनाडूतील सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला असून अभिनेता थलपती विजय यांच्या पक्षाला अखेर आवश्यक पाठिंबा मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम पक्षाला विदुथलाई चिरुथैगल काची तसेच इंडियन युनियन मुस्लिम लीगने पाठिंबा दर्शविल्याने सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.
पहिल्याच विधानसभा निवडणुकीत विजय यांच्या पक्षाने उल्लेखनीय कामगिरी करत 108 जागांवर विजय मिळवला. मात्र, स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ अपुरे असल्याने त्यांना इतर पक्षांच्या मदतीची गरज होती. विदुथलाई चिरुथैगल काचीच्या दोन आमदारांच्या पाठिंब्यामुळे विजय यांच्या गटाचे संख्याबळ बहुमताच्या आकड्यापलीकडे गेले आहे. इंडियन युनियन मुस्लिम लीगनेही समर्थन दिल्याने सरकार स्थापनेची शक्यता अधिक मजबूत झाली आहे. या यशानंतर विविध राजकीय नेत्यांकडून विजय यांचे अभिनंदन करण्यात आले. तामिळनाडूच्या राजकारणात नव्या पक्षाने केलेल्या या कामगिरीची देशभरात चर्चा सुरू आहे. विदुथलाई चिरुथैगल काचीने पाठिंब्याच्या बदल्यात काही महत्त्वाच्या अटी मांडल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्रीपदासह काही महत्त्वाची मंत्रालये देण्याची मागणी या पक्षाकडून करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेपूर्वी दोन्ही पक्षांमध्ये आणखी चर्चा होण्याची शक्यता आहे. विजय यांनी सलग तिसर्या दिवशी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा सादर केला. यापूर्वीही त्यांनी दोन वेळा राज्यपालांची भेट घेतली होती. आवश्यक पाठिंबा सिद्ध झाल्यानंतर आता शपथविधीचा मार्ग सुकर झाल्याचे मानले जात आहे.

COMMENTS