बीड : जिल्हा परिषद शिक्षण विभागाची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे सुरू करण्यात आलेल्या मिलीया शाळेच्या भागशाळा तात्काळ दंडासह बंद करण्यात याव्

बीड : जिल्हा परिषद शिक्षण विभागाची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे सुरू करण्यात आलेल्या मिलीया शाळेच्या भागशाळा तात्काळ दंडासह बंद करण्यात याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे यांनी जिल्हा परिषद शिक्षणाधिकार्यांकडे केली आहे.
यासंदर्भात शिक्षणाधिकार्यांना दिलेल्या निवेदनानंतर प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात तावरे यांनी म्हटले आहे की, मिलीया प्रशासनाने बीड शहरातील तीन ठिकाणी जिल्हा परिषद शिक्षण विभागाची कोणतीही परवानगी न घेता भागशाळा सुरू केल्या आहेत. गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून या भागशाळा अनधिकृतपणे सुरू असून, तत्कालीन जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी एच. ए. कराड यांनी 24 नोव्हेंबर 2010 रोजी दिलेल्या आदेशात या शाळा अनधिकृत असल्याचे नमूद केले होते. तसेच त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नये, असे स्पष्ट निर्देशही देण्यात आले होते.
मात्र, त्यानंतरही गटशिक्षणाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून केवळ कागदी कारवाई होत असल्याचा आरोप तावरे यांनी केला आहे. शिक्षण विभागाच्या आदेशांकडे दुर्लक्ष करून मिलीया प्रशासनाने या भागशाळांमध्ये अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांची भरती केल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
या अनधिकृत भागशाळांमध्ये शिक्षक व कर्मचार्यांची भरती करण्यास शिक्षण विभागातील कोणत्या अधिकार्यांनी परवानगी दिली, असा सवाल उपस्थित करत तावरे यांनी शिक्षण विभागातील काही अधिकार्यांच्या आशीर्वादामुळेच या भागशाळा सुरू असल्याचा आरोप केला. तत्कालीन शिक्षणाधिकार्यांचे स्पष्ट आदेश असतानाही गेल्या पंधरा वर्षांपासून या भागशाळा बंद का करण्यात आल्या नाहीत, यामागे मोठे गोड बंगाल असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
येत्या आठ दिवसांत शिक्षण विभागाने या अनधिकृत भागशाळा दंडासह बंद कराव्यात तसेच त्या ठिकाणी करण्यात आलेली नोकरभरती रद्द करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा शिक्षण उपसंचालकांकडे दाद मागण्यासह शिक्षण विभागाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही अशोक तावरे यांनी दिला आहे.

COMMENTS