महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर आधारित 'राजा शिवाजी' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. प्रेक्षक

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर आधारित ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असतानाच, आता हा चित्रपट करमुक्त करण्याची मागणी राजकीय स्तरातून जोर धरू लागली आहे. रितेश देशमुख लिखित आणि दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाने प्रदर्शनानंतर अवघ्या तीन दिवसांतच ३७ कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. तगड्या कलाकारांची फौज आणि शिवरायांचा देदीप्यमान इतिहास यामुळे हा सिनेमा लवकरच १०० कोटींचा आकडा पार करेल, अशी चिन्हे दिसत आहेत. विशेष म्हणजे, या चित्रपटातील सलमान खानच्या भूमिकेचेही सर्वत्र कौतुक होत आहे. या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते अंबादास दानवे यांनी एक मोठी मागणी केली आहे. ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट करमुक्त (Tax Free) करण्यात यावा, यासाठी दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अधिकृत पत्र लिहिले आहे.
अंबादास दानवे यांनी पत्रात म्हटले आहे की, “छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनकार्य आणि स्वराज्य स्थापनेचा इतिहास हा देशाच्या अस्मितेचा कणा आहे. न्याय आणि समानतेवर आधारित ही आदर्श शासनपद्धती नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी हा चित्रपट करमुक्त होणे आवश्यक आहे.” यासंदर्भात त्यांनी आपल्या ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटवरूनही माहिती शेअर केली आहे.
आता शासन या ऐतिहासिक चित्रपटावर करमुक्तीची मोहोर उमटवणार का? आणि हा चित्रपट कमाईचे कोणते नवे विक्रम प्रस्थापित करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS