बुलढाणा : बुलढाण्यात 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकावरून सुरू असलेला वाद आता विकोपाला पोहोचला आहे. आमदार संजय गायकवाड यांच्या घरासमोर पुस्तकाचे वाच
बुलढाणा : बुलढाण्यात ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून सुरू असलेला वाद आता विकोपाला पोहोचला आहे. आमदार संजय गायकवाड यांच्या घरासमोर पुस्तकाचे वाचन करण्यासाठी आलेल्या प्रकाशक प्रशांत आंबी यांना पोलिसांनी जिल्ह्याच्या हद्दीतच ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले आहे.
कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकात महाराजांचा एकेरी उल्लेख असल्याचा आरोप आमदार संजय गायकवाड यांनी केला होता. यावरून त्यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमकी दिल्याचेही समोर आले होते. याचा निषेध म्हणून आज रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली मोर्चा आणि गायकवाडांच्या घरासमोर जाहीर पुस्तक वाचनाचे आयोजन करण्यात आले होते.
मात्र, आज सकाळी प्रशांत आंबी बुलढाण्यात पोहोचताच पोलिसांनी त्यांना अज्ञात स्थळी हलवले आहे. केवळ आंबीच नव्हे, तर अजित नवले, बी. जी. कोळसे पाटील सहभाग करणार होते. कम्युनिस्ट पक्षाचे ५०० हून अधिक कार्यकर्ते बुलढाण्यात दाखल झाल्याने शहर छावणीत रूपांतरित झाले आहे. विशेष म्हणजे, सभेचा मंडप आणि पिण्याच्या पाण्याचे जारही पोलिसांनी हटवल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
दुसरीकडे, आमदार संजय गायकवाड आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. “वाचनावेळी महाराजांचा योग्य सन्मान केला तर स्वागत करू, पण जर शिवभक्तांच्या भावना दुखावल्या तर होणाऱ्या परिणामांना आयोजक जबाबदार असतील,” असा गर्भित इशारा गायकवाडांनी दिला आहे.
एकीकडे लोकशाही मार्गाने निषेध करण्याचा प्रयत्न आणि दुसरीकडे प्रशासकीय कारवाई, यामुळे बुलढाण्यात सध्या प्रचंड तणाव आहे. आता हे आंदोलन कोणते वळण घेणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

COMMENTS