Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिक्षणाधिकारी व शिक्षक सेनेत वादाचा प्रकार; निवेदन स्वीकारण्यास नकार दिल्याचा आरोप, शिक्षकांमध्ये असंतोष

बीड : राज्यातील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांवरून सुरू असलेल्या अस्वस्थतेदरम्यान बीड जिल्ह्यातील शिक्षण विभागात वाद निर्माण झाल्याची घटना समोर आ

कर्जतमध्ये अनैतिक संबंधातून खून?मुलीला संशय ; चौकशीची मागणी, ‘वंचित’चा आंदोलनाचा इशारा
केज नगरपंचायत घरकुल प्रकरणावरून चौकशी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; आंदोलनाचा इशारा
मिलीया शाळेच्या अनधिकृत भागशाळा दंडासह बंद करा – अशोक तावरे

बीड : राज्यातील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांवरून सुरू असलेल्या अस्वस्थतेदरम्यान बीड जिल्ह्यातील शिक्षण विभागात वाद निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या शिष्टमंडळाला शिक्षणाधिकारी (प्रा.) डॉ. किरण कुंवर यांनी निवेदन स्वीकारण्यास नकार देत कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकारामुळे शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
दि. 16 एप्रिल 2026 रोजी शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण बहिवाळ, संजय ढाकणे यांच्यासह शिष्टमंडळाने जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी कार्यालयात भेट देत विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्याचा प्रयत्न केला. या निवेदनात संचमान्यतेतील त्रुटी, अशैक्षणिक कामांचा वाढता ताण, प्रलंबित देयके, जुनी पेन्शन योजना, वेतन संरक्षण, वैद्यकीय बिल मंजुरी तसेच इतर एकूण 18 मागण्या नमूद करण्यात आल्या होत्या. मात्र, यावेळी शिक्षणाधिकारी डॉ. कुंवर यांनी थेट निवेदन स्वीकारण्याऐवजी ते आवक विभागात द्यावे, असे सांगितल्याचा तसेच काही मुद्द्यांवर कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिल्याचा आरोप शिष्टमंडळाकडून करण्यात आला आहे. या घटनेनंतर उपस्थित शिक्षक पदाधिकार्‍यांमध्ये नाराजी आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले. शिक्षकांच्या मते, आम्ही आमच्या न्याय्य मागण्यांसाठी प्रशासनाकडे गेलो होतो, मात्र अपेक्षित संवाद न झाल्याने निराशा झाली, अशी भावना व्यक्त करण्यात आली आहे. संचमान्यता 2025-26 मधील त्रुटी, अशैक्षणिक कामांचा ताण, प्रलंबित वेतन व भत्ते, एनपीएस संदर्भातील अडचणी आणि वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव प्रलंबित असल्याने शिक्षकांमध्ये आधीच अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष लक्ष्मण बहिवाळ यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त करत, शिक्षकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असेल तर आम्ही आमच्या भावना कोणाकडे मांडायच्या? असा सवाल उपस्थित केला आहे. दरम्यान, या घटनेनंतर शिक्षक सेनेने जर मागण्यांकडे तत्काळ लक्ष दिले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे. या वेळी विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील शिक्षण विभागात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून पुढील काळात हा वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

COMMENTS