मुंबई : राज्यात उन्हाळ्याच्या मध्यावरच पावसाळ्यासारखे वातावरण निर्माण झाले असून पुढील काही दिवस हवामानाचा तडाखा कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्

मुंबई : राज्यात उन्हाळ्याच्या मध्यावरच पावसाळ्यासारखे वातावरण निर्माण झाले असून पुढील काही दिवस हवामानाचा तडाखा कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. वातावरणातील बदलांना कारणीभूत ठरलेल्या पश्चिमेकडील विक्षोभासोबतच समुद्राकडून येणारे आर्द्र वारे सक्रिय झाल्याने ढगांची दाटी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर येत्या शुक्रवारपर्यंत राज्यातील अनेक भागांत वादळी वारे, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, गारपीट आणि हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाच्या पुढील तीन दिवसांच्या अंदाजानुसार 22 ते 24 एप्रिलदरम्यान मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण या सर्वच विभागांत अस्थिर वातावरण राहणार आहे. काही ठिकाणी ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, विजांसह पावसाच्या सरी कोसळतील. त्यामुळे शेती, वाहतूक आणि दैनंदिन जीवनावर तात्पुरता परिणाम होऊ शकतो. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने या परिस्थितीची दखल घेत सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोकण पट्ट्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नाशिक, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली यांसह विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर या भागांत पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पुढील दोन दिवसांत तापमानात दोन ते तीन अंशांनी घट होण्याची शक्यता असल्याने उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळणार असला, तरी हवामानातील बदलामुळे आरोग्याच्या समस्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. विजांचा कडकडाट सुरू होताच तात्काळ सुरक्षित आश्रय घ्यावा. झाडाखाली, मोकळ्या मैदानात किंवा पाण्याजवळ थांबणे टाळावे. लोखंडी वस्तूंपासून दूर राहणे आवश्यक आहे. वादळी परिस्थितीत उघड्यावर दूरध्वनी किंवा इतर विद्युत उपकरणांचा वापर टाळावा. सुरक्षित जागा उपलब्ध नसल्यास जमिनीवर आडवे न पडता पाय एकत्र करून खाली बसण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ग्रामपंचायत, पोलीस आणि आरोग्य यंत्रणांनी तातडीने जनजागृती वाढवावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. रुग्णवाहिका, अग्निशमन पथके आणि आपत्कालीन सेवा तत्पर ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून, शाळा व सार्वजनिक इमारती तात्पुरत्या निवार्यासाठी खुल्या ठेवण्याचे नियोजन करण्यावर भर देण्यात आला आहे.
शेतकर्यांनी सतर्क राहण्याच्या सूचना
शेतकर्यांनी विजांच्या इशार्याच्या काळात शेतातील कामे टाळावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. बांधकामस्थळी कामकाज तात्पुरते थांबवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच यात्रा, धार्मिक कार्यक्रम किंवा मोठ्या प्रमाणातील गर्दीची आयोजनं पुढे ढकलण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

COMMENTS