Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परशुराम म्हणजे अन्यायाविरुद्ध उभे राहिलेले तप, ज्ञान आणि धर्मतेज-महामंडलेश्वर सुधीरदास महंत

नांदेड : भगवान परशुराम यांचे व्यक्तिमत्त्व केवळ परशू धारण करणार्‍या योद्ध्यापुरते मर्यादित नसून ते ज्ञान, तपश्चर्या, न्यायसंरक्षण आणि संस्कारपरंप

नसरापूर अत्याचार प्रकरणी संताप उसळला; आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा द्या; फास्ट ट्रॅक सुनावणीची जोरदार मागणी : निखिल लातूरकर
परशुराम जयंतीच्या पूर्वी परशुराम चौकाचे सुशोभीकरण करा; महापालिका आयुक्तांनी तातडीने लक्ष द्यावे
संभवामि युगे युगे नृत्याविष्काराने नांदेडकर मंत्रमुग्ध

नांदेड : भगवान परशुराम यांचे व्यक्तिमत्त्व केवळ परशू धारण करणार्‍या योद्ध्यापुरते मर्यादित नसून ते ज्ञान, तपश्चर्या, न्यायसंरक्षण आणि संस्कारपरंपरेचे तेजस्वी अधिष्ठान असल्याचे प्रतिपादन महामंडलेश्वर सुधीरदास महंत यांनी केले. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आयोजित परशुराम तेजोत्सवाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाला नांदेड दक्षिणचे शिवसेनेचे आमदार आनंद बोंढारकर, माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत, कार्यक्रमाचे संयोजक अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. अन्याय जेव्हा सत्तेच्या सिंहासनावर बसतो, तेव्हा धर्माला शस्त्र धारण करावे लागते; आणि जेव्हा समाज दिशाहीन होतो, तेव्हा त्याला गुरुची आवश्यकता असते-या दोन्ही भूमिका परशुरामांनी समर्थपणे निभावल्या, असे त्यांनी सांगितले. महंत म्हणाले, परशुरामांचा क्रोध हा व्यक्तींवर नव्हता, तर अहंकार, अत्याचार आणि दुराचारावर होता. त्यांच्या हातातील परशू हे विनाशाचे नव्हे, तर अधर्म निर्मूलनाचे प्रतीक होते. तपशक्ती आणि शौर्य यांचा अद्वितीय संगम त्यांच्या जीवनात दिसतो. म्हणूनच भारतीय संस्कृतीत त्यांना युद्धवीराइतकेच ऋषितुल्य स्थान प्राप्त झाले आहे. भगवान परशुरामांच्या शिष्यपरंपरेचा उल्लेख करताना त्यांनी भीष्म, कर्ण, द्रोणाचार्य आणि कृपाचार्य यांची उदाहरणे दिली. अशी तेजस्वी शिष्यपरंपरा घडविणारा गुरु केवळ अस्त्रविद्या शिकवत नाही, तर संयम, कर्तव्य आणि राष्ट्रधर्मही शिकवितो, असे ते म्हणाले. श्रीकृष्ण यांनीही गुरु सांदिपनी यांच्या आश्रमात जाऊन शिक्षण घेतले, याचा दाखला देत महंत म्हणाले की, ज्ञानाला विनयाची जोड असेल तरच ते तेजस्वी बनते. पदवी माणसाला विद्वान बनवत नाही; संस्कार, शिस्त आणि नम्रता त्याला महान बनवितात. घराघरात रामरक्षा, हरिपाठ, गीता पठण, वडीलधार्‍यांचा सन्मान, ग्रंथवाचन आणि सत्संगाची परंपरा पुन्हा रुजली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. आधुनिकतेच्या प्रवाहात वाहताना संस्कृतीची मुळे उपटली जाऊ नयेत, ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महंत सुधीरदास यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आत्म्याचा वेध घेताना सांगितले की, भगवद्गीतेचे ज्ञानेश्वरीत झालेले रूपांतर हे केवळ भाषांतर नव्हते, तर जनमानसाच्या चेतनेत उतरलेले आध्यात्मिक लोकशिक्षण होते. या ग्रंथाने महाराष्ट्राच्या संस्काररचनेला दिशा, मूल्यांना अधिष्ठान आणि समाजजीवनाला नैतिक आधार दिला. वारकरी संप्रदायाच्या भक्तिमार्गाला ज्ञानेश्वरीने विचारांची गाभा दिला, तर विठ्ठलभक्तीला तत्त्वज्ञानाची उंची प्राप्त करून दिली. महाराष्ट्राच्या वैचारिक व आध्यात्मिक जडणघडणीत वारकरी संप्रदायाचा सिंहाचा वाटा असून, समता, भक्ती, श्रमसंस्कार, नम्रता आणि सामूहिकतेची जीवनदृष्टी समाजमनात रुजविण्याचे कार्य या परंपरेने केले. आचार-विचारातील सात्त्विकता, निष्ठेतील स्थैर्य आणि धार्मिक संस्कारांची दृढ मुळे याच परंपरेतून बळकट झाली. महाराष्ट्राच्या मनामनांत आजही ज्ञानेश्वरी आणि वारकरी भावनेचे तेज व अधिष्ठान स्पंदत असल्याचे त्यांनी नमूद केले. नांदेडच्या वैचारिक आणि सांस्कृतिक परंपरेचे कौतुक करताना त्यांनी ही भूमी राजकीय नेते, संत, विचारवंत आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांची भूमी असल्याचे सांगितले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय शंकरराव चव्हाण, थोर साहित्यिक नरहर कुरुंदकर, सुधाकरराव डोईफोडे, खा.अशोकराव चव्हाण यांचा नामोल्लेख त्यांनी केला. कार्यक्रमातील शिस्तबद्ध आयोजन, सांस्कृतिक सादरीकरण आणि उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यांचेही त्यांनी मनापासून अभिनंदन केले. या महोत्सवाचे संयोजक निखिलभाऊ लातूरकर यांनी हा उपक्रम सातत्याने पुढे चालू ठेवावा यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. व्याख्यानानंतर नादब्रह्म ग्रुप प्रस्तुत ‘भक्ती संध्या’ या सांगीतिक कार्यक्रमात धीरज पोळ, संतोष कुलकर्णी, सुशांत पांडे आणि प्रणोती बिलोलीकर यांनी आपल्या सुमधुर आवाजामध्ये भाव,भक्ती गीते सादर करून सभागृहाला मंत्रमुग्ध केले.  या कार्यक्रमात अभिनव भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बालासाहेब पांडे, दीपक जोशी यांना सन्मानित करण्यात आले तसेच कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी मदत करणारे पत्रकार, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी व छायाचित्रकार, वेदमंत्रांचे पठण करणारे ब्रह्मवृंद यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ‍ॅड. गजानन पिंपरखेडे व अश्विनी चौधरी यांनी केले.
निखिल लातूरकर यांनी समाजाला दिशा देण्याचे काम केले-आ. आनंद बोंढारकर
नांदेड शहरांमध्ये ब्राह्मण समाजाचे सामाजिक नेतृत्व करताना निखिल लातूरकर यांनी सातत्याने नवनवीन उपक्रम राबविले. तसेच समाजाला सामाजिक, अध्यात्मिक कार्यातून दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे अशा शब्दांमध्ये गौरव केला.

COMMENTS