Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बसवेश्वर जयंतीच्या बॅनरमधून भाजपातील गटबाजी चव्हाट्यावर ; परशुराम जयंतीकडे मात्र काही नेत्यांचा कानाडोळा ?

नांदेड : नांदेड शहरात महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी झाली; मात्र या उत्सवाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षातील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा

भूमी अभिलेख कार्यालयावरून श्रेयाची लढाई; शांतपणे डाव साधला खा.चव्हाण यांनी
कुंडलवाडीच्या विकासासाठी सकारात्मक निर्णयाची अपेक्षा
महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त ‘शिवा’ची भव्य मिरवणूक; विचारमंथनातून समाजप्रबोधन

नांदेड : नांदेड शहरात महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी झाली; मात्र या उत्सवाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षातील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे चित्र पाहायला मिळाले. शहरात लावण्यात आलेल्या विविध बॅनर्सवर वेगवेगळ्या गटांचे शक्तिप्रदर्शन दिसून आले, तर काही बॅनर्सवरील चेहर्‍यांनी राजकीय चर्चांना अधिक खतपाणी घातले.
भारतीय जनता पक्ष व शिवा संघटनेच्या नावाने लावण्यात आलेल्या काही बॅनर्सवर भाजप नेते खासदार अशोकराव चव्हाण यांच्या बरोबरीने काँग्रेसचे खासदार रवींद्र पाटील चव्हाण यांचे छायाचित्र झळकल्याने राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. हा कार्यक्रम नेमका सर्वपक्षीय होता, की भाजप-शिवा संघटनेचा संयुक्त उपक्रम, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. स्वागताध्यक्ष म्हणून भाजप महानगराध्यक्ष व माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांचे नाव झळकल्याने चर्चेला आणखी उधाण आले. एकीकडे काही नेते संयुक्त बॅनरमधून आपली जवळीक दाखवत होते, तर दुसरीकडे भाजपातील दुसर्‍या गटाने स्वतंत्र बॅनरबाजी करून आम्हीही कमी नाही असा संदेश दिल्याचे स्पष्टपणे जाणवले. राज्यसभेचे खासदार डॉ. अजित गोपछडे व भाजप प्रदेश उपाध्यक्ष संजय कोडगे समर्थकांनी स्वतंत्र पद्धतीने बॅनरबाजी केल्याने पक्षातील दोन गटांतील अदृश्य संघर्ष पुन्हा उघड झाला आहे. विशेष म्हणजे, बसवेश्वर जयंतीसाठी एवढी धडपड करणारे नेते भगवान परशुराम जयंतीच्या बाबतीत मात्र कमालीचे शांत दिसल्याची नाराजी समाजातून व्यक्त होत आहे. शहरात परशुराम जयंतीनिमित्त एकाही मोठ्या भाजप नेत्याने सार्वजनिक शुभेच्छा फलक लावला नाही, अशी चर्चा सुरू आहे. केवळ काबरा नगर येथील परशुराम चौकात सकाळी पूजनाचा औपचारिक कार्यक्रम उरकण्यात आला. त्यावेळी काही पदाधिकारी व नगरसेवक नाममात्र उपस्थित होते; मात्र व्यापक सहभाग किंवा पुढाकार दिसून आला नाही. याहून गंभीर बाब म्हणजे, परशुराम चौकात परशुची प्रतिकृती बसविण्याचा प्रस्ताव काही नगरसेवकांच्या अडथळ्यामुळे ऐनवेळी रखडल्याचे बोलले जात आहे. या कामासाठी शिलालेखही तयार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे समाजाच्या भावनांशी खेळ होत असल्याचा आरोप होत आहे. परशुराम चौकातील सुशोभीकरण रखडवण्यामध्ये पूर्वाश्रमीचा काँग्रेसचा व सध्याचा भाजपचा एक नगरसेवक कारणीभूत असल्याचे समजते. हा नगरसेवक काल व्यासपीठावर उपस्थित होता हे विशेष. वर्षभर ब्राह्मण समाजाच्या कोणत्याही उपक्रमाला मदत न करणारा व ऐनवेळी पुढे येऊन कामाचे श्रेय घेणारा हा नगरसेवक  समाजाचे कोणतेच हिताचे काम करत नसल्यामुळे नाराजीचा सूर आहे. महापालिकेत ब्राह्मण समाजाचे चार नगरसेवक निवडून आले असले, तरी समाजहिताच्या प्रश्नांवर त्यांची ठोस भूमिका किती वेळा दिसली, असा सवाल उपस्थित केला जात आहे. वर्षातून एकदा जयंतीला उपस्थित राहायचे आणि नंतर विषय विसरायचा, अशी टीका परशुराम चौकात झालेल्या कार्यक्रमात काही कार्यकर्त्यांनी उघडपणे केली. नांदेडमध्ये जयंती उत्सवांचे राजकारण, बॅनरबाजीचे प्रदर्शन आणि गटबाजीचे दर्शन वारंवार दिसत असताना खर्‍या अर्थाने समाजकारण कुठे आहे, हा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत. महापुरुषांच्या जयंतीचा उपयोग जर केवळ राजकीय उपस्थिती, छायाचित्रे आणि शक्तिप्रदर्शनासाठीच होत असेल, तर ती परंपरा नव्हे, तर समाजाच्या श्रद्धेचा अवमान ठरेल, अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

COMMENTS