नांदेड : नांदेड महानगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकावल्यानंतर शहर स्वच्छ, सुंदर आणि बॅनरमुक्त करण्याचा निर्धार महापौरांनी पहिल्या शंभर दिवसांच्या का

नांदेड : नांदेड महानगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकावल्यानंतर शहर स्वच्छ, सुंदर आणि बॅनरमुक्त करण्याचा निर्धार महापौरांनी पहिल्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमपत्रिकेत जाहीर केला होता. मात्र, या संकल्पनेलाच आता स्वपक्षीय नेत्यांच्या वाढदिवसाच्या बॅनरबाजीतून मोठा धक्का बसत असल्याची चर्चा शहरभर रंगू लागली आहे. महापौर शहराचे सौंदर्य वाढविण्याचा प्रयत्न करीत असताना काही उत्साही पदाधिकारी आणि नेत्यांनी शहरभर बॅनरांचे जंगल उभे करून प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे.
शहरातील प्रमुख चौक, रस्ते, पूल, शासकीय कार्यालयांच्या परिसरापासून गल्लीबोळापर्यंत एकाच व्यक्तीचे वाढदिवसाचे शेकडो बॅनर झळकत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नांदेडमध्ये एकही जागा रिकामी ठेवायची नाही, असा जणू काही निर्धारच या बॅनरबाज नेत्यांनी केला आहे. त्यामुळे महापौरांच्या स्वच्छता आणि सुशोभीकरण मोहिमेची प्रत्यक्षात खिल्ली उडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. व्याख्यानमंचावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदर्श घ्या, सेवा भाव जोपासा, साधेपणा स्वीकारा, असे बोलणारे काही स्थानिक नेते प्रत्यक्षात मात्र दिखाऊपणाच्या राजकारणात गुंतल्याची टीका होत आहे. स्वतःला जनतेचा सेवक म्हणवून घेण्याऐवजी काही मंडळी मंत्र्यांच्या भोवती फिरणारी ‘सुटकेस संस्कृती’ जोपासत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांतूनच व्यक्त होत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी व मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करण्याचे आवाहन करून करतात. त्यांच्या वैचारिक अधिष्ठानाला हरताळ फासण्याचे काम नांदेड मधील त्यांचे नाव घेणारी मंडळी करत आहेत. देवाभाऊंचे नाव घेण्यासाठी त्या पद्धतीचे काम सुद्धा करावे लागणार आहे. केवळ बॅनरबाजी करायची व स्वतःची प्रसिद्धी करायची यामधून भारतीय जनता पक्षाला व बॅनरबाजी करणार्या नेत्यांना काय साध्य करायचे आहे. विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजीसाठी खर्च होणारा निधी नेमका येतो कुठून, हा प्रश्नही आता सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत. सरकारी कार्यालयांतील ठेकेदार, पुरवठादार किंवा विविध मार्गांनी निधी उभारून हा दिखाऊ सोहळा राबविला जातो काय, अशी कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू आहे. शहरात मूलभूत समस्या कायम असताना वाढदिवसाच्या बॅनरांवर लाखो रुपये खर्च होणे ही जनतेची चेष्टा असल्याची भावना व्यक्त होत आहे. भाजप हा शिस्त, संघटन आणि राष्ट्रहिताचा पक्ष मानला जातो. मात्र, काही स्वार्थी मंडळी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी पक्षाची प्रतिमा मलीन करीत असल्याची खंत जुन्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. वाढदिवस साजरा करणे वेगळे आणि शहर कुरूप करणे वेगळे, असे मत अनेकांनी नोंदविले आहे. नांदेडमध्ये सुरू असलेल्या या बॅनरराजकडे भाजपच्या प्रदेश नेतृत्वाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांतून होत आहे. अन्यथा महापौरांचे बॅनरमुक्त शहराचे स्वप्न कागदावरच राहील आणि स्वपक्षीयांच्या बॅनरबाजीतून पक्षालाच राजकीय फटका बसल्याशिवाय राहणार नाही, असे जाणकारांचे मत आहे.

COMMENTS