Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भीम जयंती शांततेत पार पाडल्याबद्दल पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांचा गौरव

नांदेड : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त नांदेड जिल्ह्यात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात कार्यक्रमांचे आ

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरण विरोधात लिंबागणेश येथे निदर्शने; 11 मे रोजी बीड मोर्चाचे आवाहन
लखीमपुर खिरीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेवरून वाद; संतप्त जमावाकडून पोलीस गाडीची तोडफोड
आंबेडकर विचारांची ताकद दाखविल्याशिवाय आपले प्रश्न सुटणार नाहीत-पप्पू कागदे

नांदेड : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त नांदेड जिल्ह्यात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाने अत्यंत चोख आणि काटेकोर बंदोबस्त ठेवत आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. विशेष म्हणजे, संपूर्ण जयंती उत्सव कालावधीत कुठलाही अनुचित प्रकार घडू न देता हा उत्सव शांततेत आणि सुरळीतपणे पार पडला.
या यशस्वी नियोजनाबद्दल आणि उत्कृष्ट कामगिरीबद्दल नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक  अबिनाश कुमार यांचा आंबेडकरी चळवळीच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली व त्यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. शिष्टमंडळाने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, गेल्या एक महिन्यापासून पोलीस प्रशासनाने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने तयारी सुरू ठेवली होती. जिल्ह्यातील विविध संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त, सतत गस्त, सीसीटीव्ही निरीक्षण आणि आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित वातावरणात भीम जयंती साजरी करता आली. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी देखील यावेळी आपल्या सहकार्‍यांचे कौतुक करत सांगितले की, संपूर्ण पोलीस दलाने एकजुटीने काम करत आपली जबाबदारी पार पाडली. नागरिकांचे सहकार्यही तितकेच महत्त्वाचे ठरले असून सर्वांच्या सहभागामुळेच हा उत्सव शांततेत पार पडू शकला. या सन्मान सोहळ्यास आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते सुरेशराव गायकवाड, सुखदेव चिखलीकर, राहुल वाघमारे, हर्षु वाघमारे, गब्बर सोनवणे, कीर्ती सरोदे, शीलरत्न चावरे, प्रकाश सोंडारे, प्रीतम भद्रे शिंगे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जय भीमच्या घोषणांनी वातावरण भारावून गेले असून उपस्थितांनी पोलीस प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले.

COMMENTS