Homeताज्या बातम्याअहमदनगर

महावितरणचा भोंगळ कारभार उघड; वीज कपात, अवाजवी बिले आणि अंधारात जयंती मिरवणुका

 नांदेड शहर व जिल्ह्यातील नागरिक महावितरणच्या ढिसाळ आणि निष्काळजी कारभारामुळे हैराण झाले असून, दिवस असो वा रात्र, कोणतीही पूर्वसूचना न देता वारंव

जलतरणीकेत ‘अनधिकृत वसुली’चा खेळ; नांदेड महापालिकेची प्रतिमा पुन्हा धोक्यात
पर्यवेक्षकांनो सावधान! नीट परीक्षेच्या मानधनावर डल्ला?लेखी तक्रार देऊन कारवाईसाठी प्रशासनाला भाग पाडा
रस्त्यांची 6 पैकी 5 कामे 35 कोटींनी जादा दराने; पायाभूत सुविधा महामंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह



 नांदेड शहर व जिल्ह्यातील नागरिक महावितरणच्या ढिसाळ आणि निष्काळजी कारभारामुळे हैराण झाले असून, दिवस असो वा रात्र, कोणतीही पूर्वसूचना न देता वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने संतापाची लाट उसळली आहे. वाढत्या उष्णतेच्या काळात अचानक वीज जाणे, कमी दाबाचा पुरवठा आणि तासन्तास वीज नसणे यामुळे घरगुती ग्राहक, व्यापारी, विद्यार्थी आणि रुग्ण यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
नांदेड शहरातील अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून अनियमित वीजपुरवठ्याचे प्रमाण वाढले आहे. रात्री उशिरा वीज जाणे आणि पहाटेपर्यंत न येणे, दिवसा अचानक पुरवठा खंडित होणे, तसेच वारंवार ट्रिपिंग होणे या समस्या सातत्याने निर्माण होत आहेत. नागरिकांनी तक्रार करण्यासाठी कार्यालयात संपर्क साधला असता समाधानकारक उत्तर मिळत नसल्याची तक्रार आहे. दरम्यान, वीज बिलांबाबतही ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अनेक ग्राहकांना वापरापेक्षा जास्त बिले देण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. चुकीचे बिल दुरुस्त करून घेण्यासाठी महावितरणच्या कार्यालयात गेल्यानंतर अधिकारी व कर्मचारी योग्य प्रतिसाद देत नसल्याचे नागरिक सांगत आहेत. काही ठिकाणी मध्यस्थांच्या माध्यमातून चिरीमिरी दिल्यानंतरच बिल कमी करून दिले जात असल्याची गंभीर चर्चा सुरू आहे. या प्रकारामुळे सर्वसामान्य ग्राहकांमध्ये संताप वाढला आहे. विशेष म्हणजे, भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनीही महावितरणचा निष्काळजीपणा समोर आला. शहरातील अनेक रस्त्यांवरील पथदिवे बंद होते, तर काही प्रभागांमध्ये रात्री अचानक वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी अनेक ठिकाणी डॉ. आंबेडकर जयंतीच्या मिरवणुका अंधारात काढाव्या लागल्या. हजारो नागरिक, महिला, युवक आणि लहान मुले सहभागी असलेल्या मिरवणुकांदरम्यान रस्त्यांवर प्रकाश व्यवस्था नसल्याने गैरसोय झाली. सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रीय महत्त्वाच्या दिवशीही वीज व्यवस्था सुरळीत ठेवता येत नसेल, तर महावितरणच्या नियोजनक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अवाजवी बिले, भ्रष्टाचाराच्या तक्रारी आणि अनियमित वीजपुरवठा यांची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. नागरिकांनी आता स्पष्ट इशारा दिला असून, समस्या त्वरित न सुटल्यास महावितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

COMMENTS