Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुरी पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून अक्षय कर्डिले यांना उमेदवारी

अहिल्यानगर : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने महत्त्वाचा निर्णय घेत अक्षय शिवाजीराव कर्डिले यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. माजी आमदा

रुपयाच्या घसरणीवरून लोकसभेत खडाजंगी; देशाची आर्थिक स्थिती मजबूत, वित्तीय तूट नियंत्रणात : अर्थमंत्री सीतारामन
सहकारी संस्थेचा कारभार काटकसरीसह चिकाटीने चालवा : राजेंद्र नागवडे
अमेरिकेचा इराण युद्ध जिंकल्याचा दावा; इराणला अणुशक्ती राष्ट्र बनू देणार नसल्याचा ट्रम्प यांचा इशारा

अहिल्यानगर : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने महत्त्वाचा निर्णय घेत अक्षय शिवाजीराव कर्डिले यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेसाठी ही निवडणूक होत असून, या निर्णयामुळे स्थानिक तसेच राज्याच्या राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे.
भाजपने कर्डिले कुटुंबावर पुन्हा विश्‍वास दाखवत अक्षय कर्डिले यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर त्यांच्या कार्याचा आणि प्रभावाचा वारसा पुढे नेण्यासाठीच ही उमेदवारी दिल्याचे मानले जात आहे. राहुरी मतदारसंघात कर्डिले कुटुंबाचा दीर्घकालीन प्रभाव लक्षात घेता पक्षाने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकारणात शिवाजीराव कर्डिले यांचे व्यक्तिमत्त्व ठळक होते. राजकारणातील कुशल रणनीतीकार म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. बदलत्या राजकीय परिस्थितीतही स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्याची त्यांची क्षमता विशेष मानली जात असे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांतून काम करत विधानसभेत प्रतिनिधित्व केले आणि राहुरी मतदारसंघात मजबूत पकड निर्माण केली. कर्डिले यांचा प्रवास हा सामान्य कार्यकर्त्यापासून ते आमदार आणि मंत्रीपदापर्यंत पोहोचलेला प्रेरणादायी होता. सहकार क्षेत्रातही त्यांचा मोठा प्रभाव होता. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, शैक्षणिक संस्था आणि विविध सामाजिक उपक्रमांद्वारे त्यांनी ग्रामीण भागात विकासकामे राबवली. ‘सामान्यांचा नेता’ अशी त्यांची प्रतिमा दीर्घकाळ टिकून राहिली. बुर्‍हाणनगर येथून त्यांनी आपल्या राजकीय वाटचालीची सुरुवात केली होती. त्यांच्या कारकिर्दीत चढ-उतारही कमी नव्हते. 2009 साली ते अपक्ष म्हणून प्रथम विधानसभेत निवडून आले. त्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली, मात्र त्यात पराभव पत्करावा लागला. 2014 मध्ये त्यांनी पुन्हा विधानसभा जिंकत पुनरागमन केले, तर 2019 मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. दूध व्यवसायातून त्यांनी आपल्या सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीची पायाभरणी केली होती.

COMMENTS