कोपरगाव : वाढत्या प्लॅस्टिक वापरामुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्याची समस्या गंभीर बनत असून त्याचा मानवी आरोग्य व पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे. या

कोपरगाव : वाढत्या प्लॅस्टिक वापरामुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्याची समस्या गंभीर बनत असून त्याचा मानवी आरोग्य व पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर प्लॅस्टिक कचऱ्याचा पुनर्वापर, प्रभावी व्यवस्थापन व जनजागृती या उद्देशाने कोपरगाव पंचायत समिती व गोदामाई प्रतिष्ठान यांच्या वतीने मंगळवारी (दि. ३१) एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, प्रशासक, अधिकारी, शाळांचे मुख्याध्यापक तसेच पर्यावरणप्रेमी नागरिकांसाठी ही कार्यशाळा के. जे. सोमैय्या महाविद्यालयात आयोजित करण्यात आली आहे. पुणे येथील जलबिरादरी संस्थेचे सदस्य तथा सागर मित्र अभियानाचे प्रणेते विनोद बोधनकर हे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत प्रात्यक्षिकांसह सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यशाळेचे उद्घाटन कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे सदस्य संदीप रोहमारे यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी संदीप दळवी राहणार आहेत. यावेळी अभिनेते चिन्मय उदगिरकर, नमामी गोदा संस्थेचे राजेश पंडित, गटशिक्षणाधिकारी शबाना शेख, जलबिरादरीचे नरेंद्र चुग, व्यापारी महासंघाचे सुधीर डागा, सोमैय्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बबन वाघमोडे, प्रशांत तोरवणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
प्लॅस्टिक कचऱ्याच्या वाढत्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सचिव विजय कापसे व स्वच्छ भारत अभियान पंचायत समितीचे सचिन बोरुडे यांनी केले आहे.

COMMENTS