अहिल्यानगर : समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांच्या गौरवासाठी कै. सौ. इचरजबाई हस्तीमलजी मुनोत महिला गौरव पुरस्कार २०२६ वित

अहिल्यानगर : समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांच्या गौरवासाठी कै. सौ. इचरजबाई हस्तीमलजी मुनोत महिला गौरव पुरस्कार २०२६ वितरण सोहळा त्यांच्या स्मृतिदिनी उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया होते.
अध्यक्षीय भाषणात डॉ. आशिया म्हणाले, “मुनोत ट्रस्टच्या वतीने महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणारा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक परिवर्तन घडते.” महिलांनी विविध क्षेत्रांत प्रगती करत समाजाला नवी दिशा दिल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या पल्लवी विजयवंशी यांनी अहिल्यानगरमधील महिला विविध क्षेत्रात पुढे येत असल्याचे सांगत त्यांच्या कार्यामुळे समाज प्रगत होत असल्याचे मत व्यक्त केले. स्त्रीने जिद्दीने उभे राहणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
संस्थेचे विश्वस्त संचालक किशोर मुनोत यांनी पुरस्कारप्राप्त महिलांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या प्रेरणादायी कार्याची दखल घेऊनच हा पुरस्कार प्रदान करण्यात येत असल्याचे सांगितले. प्रास्ताविकात डॉ. स्वाती मुनोत यांनी या पुरस्कारामागील उद्दिष्ट स्पष्ट केले.
यावर्षी डॉ. मार्सिया वॉरेन यांना वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी, तर उषा देशमुख यांना औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल गौरविण्यात आले. मीनाताई मुनोत यांना सहकार व पत्रकारिता क्षेत्रातील कार्यासाठी, तर रूपाली मुनोत यांना स्नेहालय अंतर्गत स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राद्वारे करण्यात येत असलेल्या समाजसेवेबद्दल सन्मानित करण्यात आले. तसेच डॉ. मृदुला राहुल मुनोत यांना एमबीबीएसमध्ये सुवर्णपदक मिळवल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास केशरचंद गुलाबचंद मुनोत नेवासकर सार्वजनिक ट्रस्टचे सचिव लालचंदजी मुनोत, प्रकाश मुनोत, आनंद राम मुनोत, सुजाता किशोर मुनोत, प्राचार्य डॉ. खासेराव शितोळे, अहमदनगर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेचे पदाधिकारी, विविध मान्यवर, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वीणा दिघे यांनी केले तर डॉ. वर्षा कीर्तने यांनी आभार मानले.

COMMENTS