डॉ. अशोक सोनवणे/ मुंबई : प्रशासन असो किंवा सरकार असो, त्यांच्याकडून नेहमीच कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक अधिकार्यांना प्रोत्साहन देण्याची गरज असते.

डॉ. अशोक सोनवणे/ मुंबई : प्रशासन असो किंवा सरकार असो, त्यांच्याकडून नेहमीच कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक अधिकार्यांना प्रोत्साहन देण्याची गरज असते. मात्र सार्वजनिक बांधकाम खात्यात मात्र निलंबित, भ्रष्टाचाराचा कलंक लागलेल्या अधिकार्यांप्रती उदारता दाखवण्यात येत असून, कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक अधिकार्यांना, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा कुठलाही डाग नाही, निलंबनाचा कुठलाही शिक्का नाही, अशा अधिकार्यांची उचलबांगडी करण्यात येत आहे. तर दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागातून कार्यकारी अभियंता असतांना निलंबित करण्यात आलेल्या श्रीमती प्रज्ञा वाळकेंना याच विभागात मुख्य अभियंता म्हणून पदोन्नती देत वर्णी लावली जाते, त्यामुळे श्रीमती प्रज्ञा वाळकेंप्रती इतकी उदारता कशासाठी? असा सवाल सार्वजनिक बांधकाम विभागात चर्चिला जात आहे.
ज्या अधिकार्यांकडून चक्क 31 आमदारांना गंडवण्याचा प्रकार होत असेल, त्या अधिकार्यांकडून न्यायाची काय अपेक्षा करणार? अशीही चर्चा रंगतांना दिसून येत आहे. मनोरा आमदार निवास घोटाळा आणि मंत्रालय डेब्रीज प्रकरणात, उंदीर घोटाळा प्रकरणात श्रीमती प्रज्ञा वाळके यांचा सक्रिय सहभाग असल्याचे सिद्ध झाल्यानेच त्यांचे निलंबन करण्यात आले होते. मनोरा आमदार निवास इमारतीच्या देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली 31 आमदारांच्या कक्षांत कुठल्याही प्रकारची कामे न करता श्रीमती प्रज्ञा वाळके यांनी 3 कोटी 70 लाख रुपयांचा अपहार केल्याचे सिद्ध झाल्यानंतर त्यांचे निलंबन करण्यात आले होते. असे असतांना त्यांना त्याच विभागात पुन्हा एकदा पदोन्नती देत मुख्य अभियंता म्हणून बसविण्यामागे नेमका कुणाचा अट्टाहास आहे, याविषयाची दखल मुख्यमंत्री महोदयांनी घेवून चौकशी होण्याची गरज आहे.
…तोपर्यंत मालिका सुरूच राहणार
श्रीमती प्रज्ञा वाळके यांना दैनिक लोकमंथनच्या प्रकरणात निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना पुन्हा त्याच विभागात मुख्य अभियंता पदावर पदोन्नती देवून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रशासन नेमका काय संदेश देवू पाहत आहे? असा सवाल उपस्थित होत आहे. जोपर्यंत श्रीमती वाळके यांची पदोन्नती रोखत नाही, तसेच त्याच विभागात पदोन्नती देण्याऐवजी त्यांना इतरत्र चार्ज देत नाही, तोपर्यंत आम्ही आमची मालिका सुरूच ठेवणार आहोत.

COMMENTS