Homeताज्या बातम्या

उत्तर प्रदेश-बिहारमध्ये अवकाळीमुळे ४८ जणांचा मृत्यू; देशात मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज

नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेनंतर हवामानात अचानक बदल झाला असून मुसळधार पाऊस, वादळी वारे, गारपीट आणि वीज कोसळण्याच्या घटन

श्रीगोंदा-कर्जतमध्ये मुसळधार पाऊस शेती, फळबागा, घरांचे नुकसान
पुण्यात अवकाळी पावसाची हजेरी; उकाड्यातून दिलासा, तापमानात घट
चंदगडमध्ये पावसाचा हाहाकार! शेतकऱ्यांचे लाखोंचं नुकसान!” “प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा.”
Storm and Rain Claim 48 Lives in Uttar Pradesh and Bihar - Tarun Bharat

नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेनंतर हवामानात अचानक बदल झाला असून मुसळधार पाऊस, वादळी वारे, गारपीट आणि वीज कोसळण्याच्या घटनांमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गेल्या २४ तासांत झालेल्या नैसर्गिक आपत्तींमध्ये एकूण ४८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

बिहारमध्ये वादळी पाऊस आणि वीज कोसळल्याने १७ जणांचा मृत्यू झाला. राजधानी पाटणा येथे खराब हवामानामुळे चार विमानांचे मार्ग बदलावे लागले, तर १८ विमानांचे आगमन व उड्डाण उशिराने झाले. त्यामुळे शेकडो प्रवाशांना विमानतळावर प्रतीक्षा करावी लागली. हवामान विभागाने राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

उत्तर प्रदेशातही वादळी वाऱ्यांचा मोठा फटका बसला असून विविध घटनांमध्ये ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. सहारनपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊसानंतर डोंगराळ भागातून वेगाने आलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे ट्रॅक्टरसह सुमारे दहा वाहने वाहून गेली. काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटनाही घडल्या आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. राजस्थानमध्येही हवामानाचा मोठा बदल दिसून येत असून राज्यातील सुमारे ३० जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चुरू, हनुमानगड, बिकानेर आणि सीकरसह अनेक भागांमध्ये तापमानात लक्षणीय घट नोंदवण्यात आली आहे.

मान्सून सरासरीपेक्षा कमी राहणार? भारतीय हवामान विभागाने (IMD) नैऋत्य मान्सून पुढील सात दिवसांत केरळ किनारपट्टीवर दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मात्र, यंदा मान्सूनची कामगिरी सर्वसाधारणपेक्षा काहीशी कमी राहू शकते, असा प्राथमिक अंदाज विभागाने व्यक्त केला आहे. जून ते सप्टेंबर या पावसाळी हंगामात देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता असून मान्सूनचा पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या सुमारे ९० टक्क्यांपर्यंत राहू शकतो. ईशान्य भारतात समाधानकारक पाऊस होण्याची अपेक्षा असली तरी इतर अनेक भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. याचा परिणाम पावसावर अवलंबून असलेल्या शेती क्षेत्रावर होऊ शकतो.

COMMENTS