Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अवकाळी पावसाने विटभट्टी व्यवसाय उद्ध्वस्त; संगमनेरमध्ये नुकसानीचे तातडीने पंचनामे करून मदत देण्याची मागणी

संगमनेर : तालुक्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे विटभट्टी व्यवसायाला मोठा आर्थिक फटका बसला असून अनेक भट्टीधारकांचे लाखो रुपयांचे नुकस

पुण्यात अवकाळी पावसाची हजेरी; उकाड्यातून दिलासा, तापमानात घट
१९५० नंतरचा सर्वाधिक तीव्र ‘एल निनो’ सक्रिय; मान्सूनवर संकटाची छाया, दुष्काळाची भीती वाढली
बाधित फळपिकांचे पंचनामे त्वरित करा : कृषिमंत्री भरणे

संगमनेर : तालुक्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे विटभट्टी व्यवसायाला मोठा आर्थिक फटका बसला असून अनेक भट्टीधारकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आधीच वाढत्या खर्चामुळे अडचणीत सापडलेल्या या व्यवसायाला या अनपेक्षित पावसाने आणखी मोठा धक्का दिला आहे, त्यामुळे तातडीने पंचनामे करून मदत देण्याची मागणी विट उत्पादक संघाचे अध्यक्ष कैलास वाकचौरे यांनी केली आहे.
यंदा विटनिर्मितीसाठी लागणारी माती, राख, कोळसा आणि भुसा यांच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यामुळे अनेक विटभट्टीधारक आर्थिक ताणाखाली काम करत होते. अशा परिस्थितीत अचानक झालेल्या पावसामुळे तयार विटांचे तसेच प्रक्रियेत असलेल्या मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या क्षेत्रातील एक गंभीर बाब म्हणजे, विटभट्टी व्यवसायासाठी कोणतीही विमा योजना उपलब्ध नाही. देशात कदाचित हा एकमेव असा व्यवसाय असावा की ज्यासाठी विमा संरक्षणाची व्यवस्था नाही, अशी खंत व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. दरवर्षी मातीवरील रॉयल्टी आणि इतर कर नियमितपणे भरूनही, नुकसान झाल्यानंतर प्रशासनाकडून पंचनामे करण्याबाबत पुरेशी दखल घेतली जात नसल्याची तक्रार आहे. कुंभार समाजाला काही प्रमाणात रॉयल्टी सवलत मिळत असताना, विटभट्टीधारकांकडून मात्र सक्तीने रॉयल्टी वसूल केली जाते, असेही व्यावसायिकांचे म्हणणे आहे. या पार्श्‍वभूमीवर, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी, तसेच विटभट्टी व्यवसायासाठी स्वतंत्र विमा योजना लागू करण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी विट उत्पादक संघाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन जलसंधारण मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच आमदार अमोल खताळ, प्रांत अधिकारी आणि तहसीलदार, संगमनेर यांना देण्यात आले आहे. विट उत्पादक संघाचे अध्यक्ष कैलास वाकचौरे आणि अन्य पदाधिकार्‍यांनी शासनाने तातडीने सकारात्मक पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.


विट व्यवसायासाठी विमा योजना लागू करावी
अनेक वर्षांपासून विट व्यवसायासाठी विमा योजना लागू करण्याची मागणी शासन दरबारी करण्यात येत आहे; मात्र अद्याप त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले गेलेले नाही. विमा कंपन्यांकडेही हा विषय मांडण्यात आला, परंतु त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. शेतीप्रमाणेच अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची व्यवस्था विटभट्टी व्यवसायासाठीही लागू करावी, अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे. सध्या मात्र शासन आणि विमा कंपन्या एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

COMMENTS