देगलूर : केंद्र सरकारच्या ’हर घर जल’ या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन अंतर्गत देगलूर तालुक्यातील लोणी ग्रामपंचायतीसाठी तब्बल 3 कोटी 46 लाख रुपयांची

देगलूर : केंद्र सरकारच्या ’हर घर जल’ या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन अंतर्गत देगलूर तालुक्यातील लोणी ग्रामपंचायतीसाठी तब्बल 3 कोटी 46 लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. मात्र योजना मंजूर होऊन तीन वर्षांचा कालावधी उलटल्यानंतरही कामे अपूर्णच असल्याने गावकर्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. कोट्यवधींचा निधी खर्चूनही ग्रामस्थांना आजही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने या योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या योजनेअंतर्गत भुत्तहनीपरगा तलावापासून लोणी गावापर्यंत सुमारे सहा किलोमीटरची पाईपलाईन, गावातील अंतर्गत जलवाहिनी, उंच पाण्याची टाकी, विहीर तसेच इतर तांत्रिक कामे प्रस्तावित होती. मात्र प्रत्यक्षात बहुतांश कामे अर्धवट अवस्थेतच पडून आहेत. अनेक ठिकाणी पाईपलाईनचे काम अपूर्ण असून खोदलेले रस्तेही तसेच सोडण्यात आल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढत असताना गावातील महिला आणि नागरिकांना आजही दूरवरून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे ग्रामीण भागाला शाश्वत पाणीपुरवठा करण्याच्या शासनाच्या उद्देशालाच हरताळ फासला गेल्याची भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे. ग्रामस्थांच्या मते, संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्या निष्काळजीपणामुळे योजना रखडली असून कामाची गती अत्यंत संथ आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाने ठोस दखल घेतली नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते शिवाजी शिंदे यांनी केला आहे. तीन कोटी 46 लाखांहून अधिक निधी खर्च होऊनही गावाला पाणी मिळत नसेल, तर ही योजना नेमकी कोणासाठी? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून रखडलेल्या कामांसाठी जबाबदार अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान, संबंधित विभागाने या योजनेकडे तातडीने लक्ष देऊन उर्वरित सर्व कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत आणि लोणी गावातील प्रत्येक घरापर्यंत नियमित व शुद्ध पाणीपुरवठा सुरू करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

COMMENTS