Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अण्णासाहेब पाटील महामंडळाला 150 कोटींचा निधी; डॉ. ज्योतीताई मेटे यांच्या पाठपुराव्याला यश

बीड : मराठा समाजासाठी राज्य शासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आला असून, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळासाठी पहिल्या टप्प्यात 150 कोटी रु

विधान परिषदेस कुणाला मिळणार संधी? कुणाचे होणार पुनर्वसन? पहा सविस्तर
आ.संजय गायकवाडांच्या विधानाशी पक्षाचा संबंध नाही; शिवसेनेने हात झटकले, विधानाचा केला निषेध
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा पुढाकारबाभूळवाडीत महा आरोग्य शिबिरातून आरोग्यसेवेचा प्रेरणादायी आदर्श

बीड : मराठा समाजासाठी राज्य शासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आला असून, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळासाठी पहिल्या टप्प्यात 150 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. तसेच राज्याच्या अर्थसंकल्पात महामंडळासाठी एकूण 750 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याने मराठा समाजात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. नियोजन विभागाकडून यासंदर्भातील शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे.
मराठा समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना स्वावलंबी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या प्रलंबित प्रश्नांसह थकीत व्याज परताव्याबाबतच्या अडचणी सोडवण्यासाठी शिवसंग्रामच्या अध्यक्षा डॉ. ज्योतीताई विनायकराव मेटे यांनी गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला होता. यासंदर्भात त्यांनी मराठा समाज उपसमितीचे अध्यक्ष तथा पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे वारंवार मागणी केली होती. तसेच 28 मार्च रोजी निवेदन देऊन महामंडळातील थकीत व्याज परतावा तातडीने वितरित करण्याची मागणीही केली होती. यासोबतच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही सातत्याने पाठपुरावा केला होता. शासनाने या मागणीची दखल घेत निधी वितरणाचा निर्णय घेतल्याने डॉ. ज्योतीताई मेटे यांच्या पाठपुराव्याला यश मिळाल्याची भावना मराठा समाजातून व्यक्त होत आहे. या निर्णयामुळे महामंडळामार्फत लाभ घेणारे मराठा तरुण उद्योजक, व्यापारी आणि बेरोजगार युवकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत. दरम्यान, मराठा तरुण उद्योजक व व्यापार्‍यांचे प्रश्न शासन दरबारी प्रभावीपणे मांडून न्याय मिळवून दिल्याबद्दल डॉ. ज्योतीताई मेटे यांचेही उद्योजकांकडून आभार मानण्यात येत आहेत.

COMMENTS