शिष्यवृत्ती…शिक्षण आणि जुळले प्रेमही…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिष्यवृत्ती…शिक्षण आणि जुळले प्रेमही…

पाथर्डीच्या अजित व तेजश्रीची अनोखी कहाणीअहमदनगर/प्रतिनिधी- दोघेही राजर्षी शाहू महाराज देशांतर्गत शिष्यवृत्ती योजनेतून शिक्षण घेत व वैद्यकीय क्षेत्रात

वडगाव गुप्ता ग्रामस्थांनी केले सीना नदीचे जलपूजन
महाराजा अग्रसेन यांच्या विचारांची आजच्या काळात नितांत गरज – चंद्रभान अग्रवाल
सर्व शासकीय रुग्‍णालय आणि आरोग्‍य केंद्रात लसीकरणाच्‍या सुविधा मोफत : डॉ. ज्‍योती मांडगे

पाथर्डीच्या अजित व तेजश्रीची अनोखी कहाणी
अहमदनगर/प्रतिनिधी- दोघेही राजर्षी शाहू महाराज देशांतर्गत शिष्यवृत्ती योजनेतून शिक्षण घेत व वैद्यकीय क्षेत्रात काम करण्याचे स्वप्न पाहत एकमेकांच्या प्रेमात पडून विवाहबद्धही झाले. पाथर्डीतील अजित व तेजश्री उबाळे दाम्पत्याची ही प्रेरणादायी यशोगाथा. शिष्यवृत्तीमुळे उच्च शिक्षणाची वाट सुकर झाली व लग्नगाठीही जुळाल्याची ही घटना समाजकल्याण विभागाचे नाशिकचे जनसंपर्क अधिकारी सुरेश पाटील यांनी शब्दबद्ध केली आहे. अजित व तेजश्री यांच्या संघर्षगाथेची माहिती देताना पाटील यांनी सांगितले की, हलाखीच्या परिस्थितीशी दोन हात करताना त्याला रोजच्या जगण्याची भ्रांत होती. अशात उच्च शिक्षणाचा विचार करणे तर शक्य नव्हते. मात्र, सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्तीमुळे उच्च शिक्षणाचे स्वप्न तर साकार झालेच; पण आयुष्याचा जोडीदारही मिळाला. ही गोष्ट अजित व तेजश्री उबाळे या तरुण दाम्पत्यांची आहे, असे ते म्हणाले. याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, अहमदनगर जिल्हयातील पाथर्डी तालुक्यातील मोहजदेवडे हे अजित व तेजश्री उबाळे यांचे गाव आहे. सध्या सामाजिक न्याय विभागाच्या राजर्षी शाहू महाराज देशांतर्गंत शिष्यवृत्ती योजनेतून बंगलुरू येथे दोघेही बीएस्सी. नर्सिंगची पदवी घेत आहेत. अजित हा तृतीय वर्षाला शिकत आहे. तर तेजश्री ही शेवटच्या (चौथ्या) वर्षाचे शिक्षण घेत आहेत. अजितची घरची परिस्थिती अत्यंत हलाखाची आहे. आई दुसर्‍याच्या शेतात मजुरी करते. तर वडील गवंड्याच्या हाताखाली बांधकाम मजूर म्हणून काम करतात. अजितने स्वत:चे बारावीपर्यंतचे शिक्षण हे दुसर्‍यांच्या शेतात मजुरी करून घेतले. बारावी सायन्सला त्याला चांगले गुण असूनही पैशाअभावी डॉक्टर होण्याचे शिक्षण पूर्ण करता आले नाही. त्यामुळे त्याने आयटीआयला प्रवेश घेतला. 2 वर्षात शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुण्यात 2 वर्ष कंपनीत काम केले; पण मेडिकल क्षेत्रात काम करण्याचे त्याचे स्वप्न त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. त्यामुळे त्याने पुन्हा प्रयत्न करीत ‘सीईटी’ परीक्षा दिली. पण, अपेक्षित गुण नसल्यामुळे मेडिकलला प्रवेश मिळाला नाही. परंतु, बंगलुरूच्या ब्राईट कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये नर्सिंग अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला.

शिष्यवृत्तीने दिला आत्मविश्‍वास
बीएस्सी. नर्सिंगच्या चार वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक शुल्काचा प्रश्‍न अजितसमोर आ वासून उभा होता. अशातच त्याला सामाजिक न्याय विभागाच्या राजर्षी शाहू महाराज देशांतर्गत शिष्यवृत्ती योजनेविषयी मित्रांकडून माहिती मिळाली. या शिष्यवृत्तीसाठी त्याने सहाय्यक आयुक्त (समाजकल्याण, अहमदनगर) कार्यालयाकडे अर्ज केला. त्याचा अर्जही मंजूर झाला. त्याला सन 2018-19 व 2019-20 या दोन वर्षासाठी एकूण 1 लाख 43 हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली आहे. सध्या त्याचे यातून तृतीय वर्षाच्या शेवटच्या सत्राचे शिक्षण चालू आहे. या शिष्यवृत्तीने त्याला आत्मविश्‍वास दिला. बंगलुरू येथे शिष्यवृत्तीचे शिक्षण घेत असतानाच त्याच्याच कॉलेजमध्ये बीएस्सी. नर्सिंगच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या तेजश्री अजितकुमार लोहाळे या तरुणीशी त्याची गावाकडच्या नात्यातून लग्नगाठ जुळून आली. 4 जुलै 2021 रोजी दोघांचा श्रीरामपूर येथे कोरोना नियमांचे पालन करीत छोटेखानी विवाहही झाला. तेजश्रीलाही सन 2017-18 व 2018-19 या दोन वर्षाची 1 लाख 46 हजार 400 रुपयांची सामाजिक न्याय विभागाच्या राजर्षी शाहू महाराज देशांतर्गत शिष्यवृत्ती मिळाली आहे. या शिष्यवृत्तीमुळे उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळाली व नंतर एकमेकांना आयुष्याचा जोडीदारही मिळाल्याची ही यशोगाथा चर्चेची झाली आहे.

सामाजिक कामात सहभाग
अजित व तेजश्री या दोघांनाही जीवनाच्या एका टप्प्यावर आपले उच्च शिक्षण कसे होईल याची चिंता होती. मात्र, सामाजिक न्याय विभागाच्या राजर्षी शाहू महाराज देशांतर्गत शिष्यवृत्ती योजनेमुळे आम्हा दोघांचे उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न साकार झाले आहे. शिष्यवृतीत शिक्षण घेत असताना आयुष्याचा जोडीदारही मिळाला आहे. हे सर्व शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेमुळे शक्य झाले, अशी भावना अजित व तेजश्री यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात अजितने नगरमध्ये जीवनधारा हॉस्पिटल व तेजश्रीने पटीयाला हाऊस कोवीड सेंटर येथे कोरोना रुग्णांची वैद्यकीय सेवाही केली आहे. या सेवेतून त्यांनी सामाजिक सेवेचा आदर्शही घालून दिला आहे.

COMMENTS