शहर काँग्रेस राहणार…मनपा विरोधक ;मंत्री थोरातांनी दिले संकेत, शिवसेना-राष्ट्रवादीसमोर राहणार आव्हान

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शहर काँग्रेस राहणार…मनपा विरोधक ;मंत्री थोरातांनी दिले संकेत, शिवसेना-राष्ट्रवादीसमोर राहणार आव्हान

अहमदनगर/प्रतिनिधी : महापालिकेत महाविकास आघाडी सत्तेत आली असताना त्यात काँग्रेस आहे की नाही, या प्रश्‍नाला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी, मला पाह

कृषी विकास अधिकारी शंकर किरवे यांच्या संपत्तीची चौकशी करून कारवाई करा
मनपाच्या प्रोफेसर कॉलनी संकुलात पोटभाडेकरूंचाच दबदबा
आरोपीचा पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न

अहमदनगर/प्रतिनिधी : महापालिकेत महाविकास आघाडी सत्तेत आली असताना त्यात काँग्रेस आहे की नाही, या प्रश्‍नाला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी, मला पाहावे लागेल…मी पाहतो…अशा दोन शब्दातून दिलेल्या उत्तरातून भविष्यात शहर काँग्रेस मनपातील महाविकास आघाडीच्याविरोधात शड्डू ठोकून उभी राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते व राज्यातील महाविकास आघाडी सत्ता आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या थोरातांना मनपात महाविकास आघाडीची सत्ता येत असताना डावलले गेल्याची सल थोरातांच्या या दोन शब्दातून व्यक्त होत आहे. परिणामी, शहर जिल्हा काँग्रेसची मनपा व मनपातील सत्ता आणि शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्याविरोधातील भूमिका आता अधिक टोकदार होण्याची शक्यता आहे.
महापालिकेत नुकतीच शिवसेनेची सत्ता आली आहे. शिवसेनेच्या 23 संख्याबळाला राष्ट्रवादीच्या 19 व काँग्रेसच्या पाचपैकी चार नगरसेवकांनी साथ दिल्याने मनपात महाविकास आघाडी सत्तेत आल्याचे मानले जात आहे. पण यातील विरोधाभास शहर जिल्हा काँग्रेसकडून दाखवून दिला जात आहे. मनपाच्या महाविकास आघाडीच्या सत्तेत फक्त काँग्रेसचे काही नगरसेवकच आहेत, पण काँग्रेसची शहरातील संघटना ही या सत्तेविरोधातच असल्याचे चित्र महाविकास आघाडीचा महापौर झाल्यानंतर शहर काँग्रेसने खड्ड्यांच्या प्रश्‍नावर मनपावर नेलेल्या आसूड मोर्चातूनच स्पष्ट झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर नगरला कोरोना आढाव्यासाठी आलेल्या मंत्री थोरातांना जेव्हा पत्रकारांनी मनपाच्या सत्तेत काँग्रेस आहे की नाही, असे विचारले असता त्यांनी जेव्हा मला पाहावे लागेल, मी पाहतो…असे भाष्य केले. त्यातूनच शहर काँग्रेसला मनपा सत्तेविरोधातील रणकंदनाची मूक संमती दिली गेल्याचे बोलले जात आहे. मात्र, असे असेल तर मनपातील सत्तेत 67 विरुद्ध शून्य नगरसेवक असे चित्र असले तरी बाहेर मात्र मनपातील 67 विरुद्ध शहर जिल्हा काँग्रेस असाच संघर्ष राहण्याची शक्यता आहे.

काँग्रेसला डावलल्याचा राग
यंदाच्या अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव असलेल्या मनपा महापौरपदाच्या जागेसाठी शिवसेनेकडून विद्यमान महापौर रोहिणी शेंडगे व काँग्रेसकडून शीला चव्हाण इच्छुक होत्या. राष्ट्रवादीने काँग्रेसच्या चार नगरसेवकांनी आपल्याकडे वळवून चव्हाण यांना एकटे पाडल्याचे मानले जाते. चव्हाण यांच्या पाठीशी त्यांच्याच नगरसेवकांचे पुरेसे संख्याबळ नसल्याने त्यांना उपमहापौरपद दिले जावे तसेच सेनेला महापौरपद आणि राष्ट्रवादीकडे स्थायी समिती सभापतीपद असावे, अशीही महापौर-उपमहापौर निवडीआधी चर्चा होती. तशा बैठका मंत्री थोरात, आ. जगताप व युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्यात मुंबईत झाल्या होत्या व नगरलाही तांबे-जगतापांची बैठक झाली होती. तुम्ही वरून (महाविकास आघाडीचे श्रेष्ठी) उमेदवारी आणा, येथे सहकार्य करू, असा शब्द जगतापांनी तांबेंना दिल्याचे सांगितले जाते. त्यामुळे महापौर-उपमहापौर निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या दिवशी चव्हाणांनाही उपमहापौर निवडणुकीचा अर्ज भरण्याचे व त्यांच्या अर्जावर काँग्रेसच्या दोन नगरसेविकांना सूचक-अनुमोदक होण्याचे तांबेंकडून सांगण्यात आले होते. त्याचवेळी मंत्री थोरात महाविकास आघाडीतील उपमुख्यमंत्री अजित पवार व शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी याबाबत चर्चा करण्याच्या प्रयत्नत होते. पण इकडे या दोन नगरसेविकांच्या पतींनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. परिणामी, महापौर-उपमहापौर निवडणुकीतील उमेदवारीचे कोरे अर्ज घेऊन जाऊनही चव्हाण यांनी अखेरपर्यंत अर्जच भरला नाही. परिणामी, सेनेचा महापौर व राष्ट्रवादीचा उपमहापौर बिनविरोध निवडले गेले. पण या सर्व प्रक्रियेत सेना-राष्ट्रवादीने काँग्रेसच्या नगरसेवकांना समवेत ठेवताना काँग्रेसच्या नेत्यांना व त्यांच्या आदेशांना डावलल्याचे स्पष्ट झाल्याने मंत्री थोरातांनीही आता मनपा सत्तेत काँग्रेस नाही, असे सूचक भाष्य दोन शब्दांतून केले आहे. शहर काँग्रेसच्यादृष्टीने ती विरोधात काम करण्याची मूक संमती मानली जात आहे. त्यामुळेच आता मनपाच्या राजकारणात नागरी सुविधांच्या प्रश्‍नांच्या आडून शहर काँग्रेस सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचे चार नगरसेवक यांना तसेच आ. जगताप यांना टार्गेट करण्याची शक्यता आहे. थोरातांच्या भाष्यातून मनपात आता काँग्रेस संघटना विरोधात राहणार असल्याचेही स्पष्ट झाल्याने भविष्यातील मनपातील महाविकास आघाडी व शहर काँग्रेस यांच्यातील संघर्ष उत्सुकतेचा असणार आहे.

चव्हाण समर्थक नाराज
शहर काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे हे मनपावर टीका करण्याच्या माध्यमातून शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना टार्गेट करीत असल्याने त्या नाराजीतून आ. जगतापांनी महापौर-उपमहापौर निवडणुकीत शीला चव्हाण यांना मदत केली नसल्याचा दावा करून चव्हाण समर्थक नाराज आहेत. शिवाय, याच कारणाने भविष्यातही मनपातील महाविकास आघाडीच्या सत्तेत चव्हाणांना स्थान मिळणार की नाही, याचीही शाश्‍वती नसल्याने शहरात संघटनात्मक नाराजी वाढण्याचीही शक्यता आहे. यावर मात करण्याचे आव्हान काँग्रेस नेत्यांसमोर आहे.

COMMENTS