Homeताज्या बातम्यादेश

इराण युद्ध थांबणार ; अमेरिकन संसदेत युद्धविरोधी प्रस्ताव मंजूर

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या संसदेत इराणविरोधातील लष्करी कारवाईवर नियंत्रण आणण्याच्या उद्देशाने महत्त्वाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. या प्रस्ताव

महासत्तांना जागतिक संतुलन बनवावे लागेल; अन्यथा…!
व्हेनेझुएलावर हल्ला आणि ट्रम्प यांचा दुटप्पीपणा !
मध्यपूर्वेत युद्धाची नांदी !


वॉशिंग्टन : अमेरिकेच्या संसदेत इराणविरोधातील लष्करी कारवाईवर नियंत्रण आणण्याच्या उद्देशाने महत्त्वाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. या प्रस्तावामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धसंबंधी अधिकारांवर मर्यादा येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मतदानावेळी सत्ताधारी पक्षातील चार सदस्यांनीही विरोधी सदस्यांना पाठिंबा दिला, तर तीन सदस्य मतदानापासून दूर राहिले.
हा प्रस्ताव 50 विरुद्ध 47 मतांनी मंजूर झाला. मात्र, तो कायद्यात रूपांतरित होण्यासाठी अजून काही संसदीय प्रक्रिया पूर्ण कराव्या लागणार आहेत. अंतिम मंजुरी मिळाल्यास, इराणविरोधातील कोणतीही दीर्घकालीन लष्करी कारवाई सुरू ठेवण्यासाठी राष्ट्राध्यक्षांना संसदेकडून अधिकृत परवानगी घ्यावी लागेल. सध्या या प्रस्तावावर उच्च सभागृहात अंतिम निर्णय बाकी असून त्यानंतर प्रतिनिधी सभेची मंजुरी आवश्यक राहणार आहे. तथापि, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याकडे या प्रस्तावावर नकाराधिकार वापरण्याचा पर्याय उपलब्ध आहे. तो नकाराधिकार निष्प्रभ करण्यासाठी दोन्ही सभागृहांत दोन-तृतीयांश बहुमत आवश्यक असते, जे सध्याच्या राजकीय परिस्थितीत कठीण मानले जात आहे. या प्रस्तावामागे विरोधी पक्षाचा आग्रह असा आहे की, युद्ध छेडण्याचा किंवा परदेशात सैन्य पाठवण्याचा अधिकार केवळ राष्ट्राध्यक्षांकडे नसून संसदेकडे असावा. अमेरिकेच्या राज्यघटनेतही युद्धासंबंधी अंतिम अधिकार संसदेला देण्यात आल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. व्हर्जिनिया राज्यातील डेमोक्रॅट पक्षाचे सदस्य टिम केन यांनी हा प्रस्ताव मांडला. चर्चेदरम्यान त्यांनी सांगितले की, मध्यपूर्वेतील परिस्थिती गंभीर असताना राष्ट्राध्यक्षांनी संसदेसमोर स्पष्ट भूमिका मांडणे आवश्यक आहे. युद्धविरामाच्या शक्यता निर्माण होत असताना प्रशासनाने आपली रणनीती जनतेसमोर ठेवावी, अशी मागणी त्यांनी केली. दुसरीकडे, व्हाईट हाऊसने राष्ट्राध्यक्षांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. अमेरिकेच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती कारवाई करण्याचा अधिकार राष्ट्राध्यक्षांना असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. अमेरिकेतील विद्यमान कायद्यानुसार, संसदेकडून मंजुरी न घेता कोणताही राष्ट्राध्यक्ष केवळ 60 दिवसांपर्यंत लष्करी कारवाई करू शकतो. त्यानंतर युद्ध समाप्त करणे, संसदेकडून अधिकृत मान्यता घेणे किंवा सैन्याच्या सुरक्षित माघारीसाठी अतिरिक्त मुदत मागणे आवश्यक असते. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिकेकडून इराणवर मोठा हल्ला करण्याची तयारी होती, मात्र तो सध्या स्थगित करण्यात आल्याचे सांगितले. कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती यांनी चर्चेला संधी देण्याची विनंती केल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले.
युद्ध लवकरच संपेल : ट्रम्प
व्हाईट हाऊसमधील कार्यक्रमात बोलताना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणसोबतचा संघर्ष लवकरच समाप्त होईल, असा दावा केला. इराणला करार करायचा आहे, मात्र त्याला अण्वस्त्र क्षमता मिळू देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबतच्या बैठकीत मध्यपूर्वेतील हिंसाचार तात्काळ थांबवण्याचे आवाहन केले. आखाती प्रदेश अत्यंत संवेदनशील टप्प्यावर असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यास जागतिक अस्थिरता वाढू शकते, असा इशारा त्यांनी दिला.

COMMENTS