मुंबई : देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याच्या चर्चांवर बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारकडे इंधनाचा पुर

मुंबई : देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याच्या चर्चांवर बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारकडे इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात कोणतीही इंधनटंचाई नाही, असा दावा देखील त्यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौर्यांवरून सातत्याने होत असलेल्या टीकेबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी यांनी ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांच्या विधानाचा संदर्भ देत महत्त्वपूर्ण भूमिका मांडली. पंतप्रधानांचे परदेश दौरे हे केवळ राजकीय स्वरूपाचे नसून देशाच्या आर्थिक, सामरिक आणि औद्योगिक हिताशी संबंधित असल्याचे सांगत त्यांनी विनाकारण टीका करणे योग्य नसल्याचे स्पष्ट केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शरद पवार यांनीदेखील पंतप्रधान मोदी यांच्या परदेश दौर्यांमुळे भारताला विविध देशांसोबत महत्त्वपूर्ण करार आणि गुंतवणुकीच्या संधी मिळत असल्याचे मान्य केले आहे. देशाच्या भविष्यासाठी हे दौरे उपयुक्त ठरत असल्याने त्याकडे केवळ राजकीय चष्म्यातून पाहणे चुकीचे ठरेल, असे त्यांनी नमूद केले. यावेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना फडणवीस यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावर निशाणा साधला. यापूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे शरद पवार यांनी नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी भाषेचे भान ठेवावे, असा सल्ला दिला होता, याचाही त्यांनी उल्लेख केला.
राज्यातील आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी महायुतीच्या एकजुटीवर भर दिला. महायुतीतील सर्व घटक पक्षांनी एकत्रितपणे निवडणूक लढविणे हीच सध्याची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जागावाटप, प्रचार आराखडा आणि निवडणूक धोरण याबाबत तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्र बसून अंतिम निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले. राजकीय स्थैर्य टिकवण्यासाठी आणि विरोधकांना प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी महायुतीची एकजूट आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. इंधनटंचाईवर बोलतांना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अफवांमुळे अनेकदा नागरिक गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी करतात. त्यामुळे काही ठिकाणी तात्पुरता पुरवठा विस्कळीत झाल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. मात्र याचा अर्थ इंधनसाठा संपला असा होत नाही. जागतिक पातळीवरील तणावपूर्ण परिस्थितीतही केंद्र सरकारने पुरवठा साखळी मजबूत ठेवली असल्याचा दावा त्यांनी केला.नागरिकांनी संयम राखून अफवांना बळी पडू नये तसेच इंधनाचा अनावश्यक साठा करून परिस्थिती अधिक गंभीर बनवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
पोलिस वाहनांसाठी इंधन पुरेशा प्रमाणात
पोलिस वाहनांना इंधन मिळण्यात अडचणी येत असल्याच्या चर्चेलाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी फेटाळून लावले. राज्यातील सर्व पोलिस यंत्रणांसाठी आवश्यक तेवढे पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागपूरमधील एका घटनेचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, एका पोलिस कर्मचार्याने चुकीची माहिती दिल्यामुळे गैरसमज निर्माण झाला होता. प्रत्यक्षात इंधन उपलब्ध असतानाही निष्काळजीपणे उत्तर देण्यात आले होते. या प्रकरणी संबंधित कर्मचार्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

COMMENTS