मुंबई: मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकल ट्रेनमध्ये एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना घडली आहे. धावत्या लोकलच्या प्रथम श

मुंबई: मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकल ट्रेनमध्ये एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना घडली आहे. धावत्या लोकलच्या प्रथम श्रेणी (First Class) डब्यात दरवाजा बंद करण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका २२ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. या धक्कादायक घटनेमुळे लोकल प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ही घटना मंगळवारी रात्री घडली.
दरवाजा बंद करण्याच्या किरकोळ कारणावरून वाद
मिळालेल्या माहितीनुसार, मयंक लोहार असे मृत तरुण प्रवाशाचे नाव असून, तो अंधेरी ते बोरीवली दरम्यान प्रवास करत होता. मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावासामुळे लोकलच्या डब्यात पावसाचे पाणी आणि तुषार आत येत होते. यामुळे काही प्रवाशांनी डब्याचा दरवाजा बंद करण्याची सूचना केली. याच मुद्द्यावरून मयंक आणि इतर एका प्रवाशामध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. काही वेळातच हा वाद अत्यंत टोकाला गेला आणि संतापलेल्या संबंधित प्रवाशाने स्वतःजवळ असलेल्या धारदार शस्त्राने मयंकवर थेट वार केले. या हल्ल्यात मयंक गंभीर जखमी झाला. डब्यातील इतर प्रवाशांनी त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्यामुळे मयंकचा जागीच मृत्यू झाला.
रेल्वे प्रशासनाकडे सुरक्षेची मागणी
या घटनेमुळे उपनगरीय लोकल मधील प्रवाशांच्या सुरक्षेबाबत तीव्र चिंता व्यक्त होत आहे. किरकोळ कारणावरून जीवघेणे हल्ले होण्याच्या वाढत्या प्रकारांमुळे प्रवाशांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. विशेषतः गर्दीच्या आणि पावसाळ्याच्या दिवसांत प्रवाशांमधील वाद टोकाला जात असल्याचे चित्र समोर येत आहे. गेल्या काही महिन्यांत पश्चिम रेल्वे मार्गावर अशा हिंसक घटना घडल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. रेल्वे प्रशासनाने सुरक्षा यंत्रणा अधिक बळकट करावी, गस्त वाढवावी आणि संवेदनशील मार्गांवर विशेष लक्ष द्यावे, अशी भावना प्रवासी संघटनांनी व्यक्त केली आहे.

COMMENTS