परभणी : मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी करणारी चिठ्ठी लिहून जिंतूर तालुक्यातील भोसी येथील ३० वर्षीय तरुणाने आत्महत्या
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
परभणी : मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी करणारी चिठ्ठी लिहून जिंतूर तालुक्यातील भोसी येथील ३० वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गणेश आश्रोबा ठोंबरे असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना ९ ऑगस्ट रोजी सायंकाळाच्या सुमारास घडली. गणेश ठोंबरे यांनी राहत्या घरात आत्महत्या केल्याचे निदर्शनास आल्यानंतर नातेवाईकांनी त्यांना तातडीने जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईक तसेच ग्रामस्थांनी रुग्णालय परिसरात गर्दी केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर बामणी पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तसेच रुग्णालयात जाऊन प्राथमिक चौकशी केली. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश ठोंबरे हे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून चिंतेत होते. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने ते निराश असल्याचे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले. याच पार्श्वभूमीवर त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. गणेश यांच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली. त्यात मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करत सरकारने आरक्षणाचा प्रश्न लवकर सोडवावा, अशी मागणी करण्यात आली होती. या चिठ्ठीमुळे आत्महत्येमागील कारणाबाबत पोलिस तपासाला महत्त्वाचा आधार मिळाला आहे. दरम्यान, १० ऑगस्ट रोजी सकाळी शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. गणेश ठोंबरे यांच्या पश्चात वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे भोसी गावात हळहळ व्यक्त होत आहे.

COMMENTS