मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागाने नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्यातील २२७० कोटींच्या टेंडरच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे पुरा

मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागाने नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्यातील २२७० कोटींच्या टेंडरच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे पुराव्यासह वार्तांकन दैनिक लोकमंथनमधून केले असून, यासंदर्भाच्या तक्रारी थेट पंतप्रधान कार्यालय, मुख्यमंत्री कार्यालय, सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्याकडे केलेल्या असताना पुन्हा एकदा ५०० कोटींचा बनावट टेंडर घोटाळा उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे यासंदर्भातील माहिती कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनीच पत्रकार परिषदेत दिली आहे. यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांच्या नावावर बनावट ऑफलाइन निविदा आणि वर्क ऑर्डर तयार करून तब्बल ५०० कोटींचा टेंडर घोटाळा केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या कथित रॅकेटमध्ये जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील दोन आणि धुळे जिल्ह्यातील एका व्यक्तीचा समावेश असल्याची माहिती स्वतः महाजन यांनी दिली आहे. स्वतंत्र कुंभमेळ्यासाठी शासनाने प्राधिकरण स्थापन केले असून, त्यात पाच आयएएस अधिकारी कार्यरत आहेत, त्यामुळे कुंभमेळ्याशी संबंधित निविदा प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनेच होत असताना, या कथित टोळीने प्रशासनाच्या नावाचा गैरवापर करून बनावट ऑफलाइन ऑर्डर तयार केल्याचे समोर आले आहे. नाशिक कुंभमेळ्यासाठी शासनाकडून विविध कामांची निविदा प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया अधिकृत पद्धतीने राबविली जात असताना काही व्यक्तींनी तिचा गैरफायदा घेत बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून कंत्राटदारांना आपल्या जाळ्यात ओढल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून संबंधितांविरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले. नाशिक आणि मुंबई येथेही या प्रकरणाशी संबंधित गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. नाशिकच्या पोलीस आयुक्तांना याप्रकरणी तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कुंभमेळ्यासारख्या मोठ्या धार्मिक आयोजनाच्या कामांच्या नावाखाली शासनाची प्रतिमा मलीन करणाऱ्या आणि कंत्राटदारांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तींना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असा इशाराही महाजन यांनी दिला. विभागीय आयुक्तांच्या नावाने बनावट आदेश या टोळीने विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या नावाचा वापर करून काही कामांचे बनावट कार्यादेश तयार केल्याचे तपासात समोर आले आहे. मात्र, शासकीय पातळीवर अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक नावाने अशा स्वरूपाचे कार्यादेश दिले जात नाहीत. त्यामुळे संबंधित कागदपत्रे बनावट असल्याचे स्पष्ट होत असल्याचे महाजन यांनी सांगितले. कुंभमेळ्याच्या कामांसाठी निविदा मिळाल्याचे भासवून कंत्राटदारांकडून पैसे तसेच धनादेश घेण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. पोलिसांसाठी भोजन, पाण्याच्या बाटल्या, अडथळे उभारण्यासाठी लागणारे साहित्य आणि इतर वस्तू पुरविण्याच्या नावाखाली हे बनावट आदेश देण्यात आले. बारा बनावट कार्यादेश हाती आतापर्यंत अशा प्रकारचे बारा बनावट कार्यादेश प्रशासनाच्या हाती लागले आहेत. या कागदपत्रांमधून सुमारे ५०० कोटी रुपयांच्या निविदा प्रक्रिया झाल्याचे भासविण्यात आले आहे. संबंधित बनावट आदेशांच्या प्रती मंत्री महाजन यांनी पत्रकारांसमोर सादर केल्या. या कागदपत्रांवर अधिकृत संकेतांक किंवा शासनमान्य तांत्रिक पडताळणीची चिन्हे नसल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे कंत्राटदारांनी अशा प्रकारच्या आदेशांची अधिकृत यंत्रणेकडून खातरजमा केल्याशिवाय कोणताही आर्थिक व्यवहार करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. उच्चपदस्थ आयएएस अधिकाऱ्याशी नातेसंबंध सांगणारे ते कोण ? या फसवणूक प्रकरणात धुळ्यातील एका व्यक्तीचा समावेश असल्याचे समजते. धुळ्यातील हा व्यक्ती शिक्षक असल्याचे समजते. पेशाने शिक्षक असलेला हा व्यक्ती एका बड्या उच्चपदस्थ आयएएस व्यक्तीचा नातेवाईक असल्याचे सांगत होता. या उच्चपदस्थ आयएएस अधिकाऱ्याचे नाव आम्हाला माहित असले तरी, पोलिसांनी या आयएएस अधिकाऱ्याचे आणि या धुळ्याच्या शिक्षकाचे नेमके काय लागे-बांधे आहेत? ते खरंच नातेवाईक आहेत का? या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची गरज आहे. धुळ्यातील व्यक्तींसोबत जामनेरमधील काहींना ताब्यात घेण्यात आले आहे. या टोळीने छत्रपती संभाजीनगर तसेच मुंबईतील मोठ्या कंत्राटदारांनाही बनावट कार्यादेश दिल्याची माहिती पुढे आली आहे.

COMMENTS