शिरवळ : पुणे-सातारा महामार्गावर शिरवळजवळील हॉटेल शिवालयसमोर मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य

शिरवळ : पुणे-सातारा महामार्गावर शिरवळजवळील हॉटेल शिवालयसमोर मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने गेली आणि समोरून येणाऱ्या मालवाहू ट्रकला धडकली. धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मावळ आणि तळेगाव दाभाडे परिसरातील सहा तरुण कारमधून साताऱ्याच्या दिशेने निघाले होते. मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास त्यांची कार शिरवळ परिसरात आली. त्याच वेळी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. भरधाव कार महामार्गाच्या दुभाजकावर आदळून तो ओलांडत रस्त्याच्या विरुद्ध बाजूला गेली. याचवेळी समोरून येणाऱ्या मालवाहू ट्रकला कारची जोरदार धडक बसली. अपघाताची तीव्रता एवढी होती की कारचे मोठे नुकसान झाले. कारमधील चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये वेदांत वारिंगे, सोनुलिंग ठाकूर, आदित्य गरुड आणि निखिल राऊत यांचा समावेश आहे. अन्य दोन तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच सारोळा महामार्ग पोलीस तसेच शिरवळ पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीचा वेग काही काळ मंदावला होता. पोलिसांनी यंत्राच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. या दुर्घटनेची नोंद शिरवळ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

COMMENTS