भोकर : तालुक्यातील सोमठाणा येथे जुन्या वादातून एका तरुणाचा गळा आवळून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. १७ जून) घडली. या प्र

भोकर : तालुक्यातील सोमठाणा येथे जुन्या वादातून एका तरुणाचा गळा आवळून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. १७ जून) घडली. या प्रकरणातील मुख्य आरोपीसह चार संशयितांना अवघ्या २४ तासांत ताब्यात घेण्यात भोकर पोलिसांना यश आले असून, त्यांच्या या तत्पर कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
माहितीनुसार, सोमठाणा येथील रहिवासी हणमंत रंगराव कोडगिरे आणि ज्ञानेश्वर विठ्ठल पोलवाड हे अनेक वर्षांपासून एकमेकांचे मित्र होते. मात्र, बुधवारी दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास जुन्या भांडणाच्या कारणावरून दोघांमध्ये अचानक मोठा वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर हणमंत कोडगिरे याने ज्ञानेश्वर पोलवाड यांचा दस्तीने (रुमालाने) गळा आवळून खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेत ज्ञानेश्वर पोलवाड यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डी. एस. हाके आणि प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेंद्र औटे यांनी पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, घटनास्थळावर १०० ते १५० नागरिकांचा संतप्त जमाव जमा झाल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. आरोपींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी मृत तरुणाच्या नातेवाईकांनी लावून धरली होती.
पोलिसांनी फिरवली तपासाची चक्रे पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. मुख्य आरोपी हणमंत रंगराव कोडगिरे हा पेट्रोल पंप परिसरात लपून बसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला सापळा रचून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याचे साथीदार माधव रंगराव कोडगिरे, संतोष रंगराव कोडगिरे आणि दशरथ रंगराव कोडगिरे यांनाही अवघ्या २४ तासांच्या आत पोलिसांनी जेरबंद केले.
फिर्यादी इंदिराबाई विठ्ठल पोलवाड यांच्या तक्रारीवरून भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३०६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(२) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना गुरुवारी (दि. १८ जून) न्यायालयात हजर करण्यात आले असून, त्यांच्या पाच दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डी. एस. हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. प्रभारी ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेंद्र औटे, सहाय्यक फौजदार लक्षठवार, हेड कॉन्स्टेबल घुमनार, हेड कॉन्स्टेबल खिलारे, गोपनीय शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल परमेश्वर गाडेकर तसेच पोलीस कॉन्स्टेबल आरेवर यांनी या तपासात विशेष परिश्रम घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेंद्र औटे करीत आहेत.

COMMENTS