मुंबई :महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना सध्या वेग आला असून, ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील अंतर्गत हालचालींना अधिक महत्त्व प्राप्त

मुंबई :महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना सध्या वेग आला असून, ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील अंतर्गत हालचालींना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. ठाकरे गटातील सहा खासदारांनी वेगळी भूमिका घेतल्याची चर्चा सुरू असतानाच, आता काही आमदारही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सहभागी होऊ शकतात, असा दावा प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय नियोजनाचे कौतुक केले. त्यांनी म्हटले की, खासदारांनंतर काही आमदारही शिंदे गटाकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिंदे यांचे नियोजन आणि संघटन कौशल्य प्रभावी असल्याचा दावा त्यांनी केला. कडू म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा प्रयत्न शिंदे करत आहेत. राज्यातील शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, दिव्यांग आणि वंचित घटकांशी त्यांचा सातत्याने संपर्क असल्यामुळे अनेक लोकप्रतिनिधी त्यांच्याकडे आकर्षित होत असल्याचेही त्यांनी सांगितले. ठाकरे गटातील सहा खासदारांनी स्वतंत्र भूमिका घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबत लोकसभा अध्यक्षांकडे पत्र दिल्याची माहिती विविध सूत्रांकडून समोर येत आहे. जर या खासदारांनी अधिकृतपणे शिंदे गटात प्रवेश केला, तर लोकसभेतील शिंदे गटाचे संख्याबळ लक्षणीय वाढू शकते. राजकीय विश्लेषकांच्या मते, अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील महायुतीमध्ये शिवसेनेचे स्थान अधिक बळकट होऊ शकते. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ठाकरे गटाचे खासदार परभणीचे संजय जाधव, यवतमाळ-वाशीमचे संजय देशमुख, हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर, धाराशिवचे ओमराजे निंबाळकर, शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे आणि ईशान्य मुंबईचे संजय दीना पाटील यांनी बंडखोरी केली आहे. या सर्व राजकीय हालचालींवर अधिकृत शिक्कामोर्तब अद्याप झालेले नसले, तरी येत्या काही दिवसांत संसदीय स्तरावर यासंदर्भात महत्त्वपूर्ण घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राजकीय पक्षांसह जनतेचेही लक्ष दिल्लीतील हालचालींकडे लागले आहे.
अधिकृत शिक्कामोर्तब लोकसभा अध्यक्षांच्या भूमिकेनंतरच
पक्षांतरविरोधी कायद्याच्या निकषांनुसार दोन-तृतीयांश संख्याबळाचा मुद्दा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. संबंधित खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केल्यास त्यांच्या राजकीय भवितव्याबाबतचे निर्णय संसदीय प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहेत. अंतिम निर्णय लोकसभा अध्यक्षांच्या भूमिकेनंतरच समोर येणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.
ठाकरे गटासमोरील आव्हान वाढले
या संभाव्य घडामोडींमुळे ठाकरे गटासमोर संघटनात्मक आणि राजकीय आव्हाने उभी राहिली आहेत. पक्षातील लोकप्रतिनिधींना एकत्र ठेवण्याचे आव्हान वाढले असून, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय हालचालीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ‘ऑपरेशन टायगर’च्या पुढील टप्प्याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

COMMENTS