मुंबई : शिंदे यांच्या शिवसेनेत ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी प्रवेश केल्यामुळे शिंदे यांचे केंद्रात वजन चांगलेच वाढले आहे. त्याचा फायदा केंद्रीय मंत
मुंबई : शिंदे यांच्या शिवसेनेत ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी प्रवेश केल्यामुळे शिंदे यांचे केंद्रात वजन चांगलेच वाढले आहे. त्याचा फायदा केंद्रीय मंत्रिमंडळात होणार असल्याचे दिसून येत आहे. कारण केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्ताराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, शिवसेनेला केंद्रात अधिक प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लोकसभेतील वाढलेल्या संख्याबळामुळे शिवसेनेला एक मंत्रिमंडळ दर्जाचे आणि दोन राज्यमंत्री अशी एकूण तीन पदे मिळू शकतात, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संभाव्य दिल्ली दौर्याकडेही राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव मंत्रिमंडळ दर्जाच्या पदासाठी चर्चेत असल्याचे सांगितले जात आहे. महायुतीचे राजकीय समीकरण अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने त्यांच्या नावाला महत्त्व दिले जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यापूर्वी त्यांनी केंद्रीय जबाबदारी स्वीकारलेली नसली तरी, यावेळी त्यांना महत्त्वाची भूमिका मिळू शकते, अशी चर्चा आहे. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे नाव राज्यमंत्रीपदासाठी पुढे येत आहे. अलीकडील राजकीय बदलांनंतर त्यांना केंद्रात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जबाबदार्यांमध्ये फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही खात्यांचा कार्यभार नव्या चेहर्यांकडे सोपवला जाऊ शकतो, तर त्यांच्या विद्यमान स्वतंत्र जबाबदारीत सातत्य राहू शकते, अशी चर्चा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसलाही मंत्रिमंडळ दर्जाचे प्रतिनिधित्व मिळू शकते, असे बोलले जात आहे. ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, अधिकृत घोषणा होईपर्यंत कोणताही निर्णय निश्चित मानला जात नाही.
भाजपमध्येही बदलांची शक्यता
केंद्रीय स्तरावर भाजपमध्येही काही महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विविध मंत्रालयांच्या जबाबदार्यांमध्ये फेरबदल, नव्या चेहर्यांचा समावेश आणि काही वरिष्ठ नेत्यांना संघटनात्मक जबाबदार्या देण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. माजी भारतीय रिझर्व्ह बँक प्रमुख शक्तिकांत दास, खासदार अरुण गोविल तसेच अनुराग ठाकूर यांच्या भूमिकांबाबतही विविध राजकीय अंदाज व्यक्त केले जात आहेत. तथापि, यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
प्रादेशिक आणि सामाजिक समतोलावर भर
आगामी उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुका, विविध राज्यांतील राजकीय समीकरणे आणि सहयोगी पक्षांचे प्रतिनिधित्व लक्षात घेऊन मंत्रिमंडळ विस्तारात प्रादेशिक व सामाजिक संतुलन साधण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. नव्या सहयोगी घटकांना शासन व्यवस्थेत स्थान देऊन राष्ट्रीय पातळीवरील राजकीय समन्वय अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाऊ शकतो.

COMMENTS