Homeताज्या बातम्यासंपादकीय

आजची महिला आणि सक्षमीकरण

जगभरात आज महिला दिन उत्साहात साजरा करण्यात येत आहे. भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशामध्ये देखील लोकसभा निवडणुकीची धामधूम असतांना महिला दिनाचा उत्स

परदेशी विद्यापीठांसाठी भारतीय बाजारपेठ खुली
विकासाचे राजकारण…
पाणीटंचाईचे संकट

जगभरात आज महिला दिन उत्साहात साजरा करण्यात येत आहे. भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशामध्ये देखील लोकसभा निवडणुकीची धामधूम असतांना महिला दिनाचा उत्साह दिसून येत आहे. एकेकाळी चूल आणि मूल इतकंच विश्‍व असणारी महिला आज सक्षम झाली आहे, मात्र तिचे प्रश्‍न आजही सुटलेले नाही. तर त्या प्रश्‍नांनी नवे रूप धारण केले आहे. आजही महिलांकडे बघण्याची दृष्टी बदललेली नाही. त्यामुळे खरंच आजही महिला सुरक्षित आहे का ? असा सवाल उपस्थित होतो.
महिलांना पुरूषाच्या बरोबरीने स्थान मिळाले पाहिजे, यासंदर्भातील चळवळ महाराष्ट्र आणि तत्कालीन बंगाल या दोन प्रातांत झाल्याचे दिसून येते. महाराष्ट्रामध्ये तर महात्मा फुले यांनी महिलांचे सक्षमीकरण करायचे असेल तर, महिला प्रथम शिक्षित झाली पाहिजे यासाठी त्यांनी महिलांसाठी शिक्षणाचे दारे खुली केली. महिलांसाठी अनेक शाळा सुरू केल्या. त्यावर कळस डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चढवला. त्यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून आणि हिंदू कोड बिलाच्या मदतीने त्यांनी महिलांना त्यांचे न्याय-हक्क मिळवून दिले. त्यामुळेच खर्‍या अर्थाने महिला आज विश्‍व व्यापून टाकतांना दिसून येत आहे. अवकाश, उद्योग, पोलिस, लष्कर, नौदल, यासह विविध क्षेत्रांत तिने तिचे विश्‍व आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर निर्माण केले आहे. पुरुषांची मिजास असलेल्या क्षेत्रात महिलांनी प्रवेश करुन, आपण अबला नसून सबला असल्याचे सिद्ध केले आहे. महिलांनी सर्वच क्षेत्रात आपल्या कर्तबगारीने यश मिळविले असले, तरी देखील पुरुषांची महिलांकडे बघण्याची दृष्टी अजूनही बदलली नाही, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. जगातील महिलांना आर्थिक, सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या सक्षम करण्यासाठी जागतिक महिलादिनाची घोषणा करण्यात आली होती. या घोषणेला शतकापेक्षा अधिक काळ लोटूनही भारतीय महिला कितपत सक्षम झाल्या, हा प्रश्‍न आजही अजेंड्यावर आहे. नाही म्हणायला प्रत्येक क्षेत्रांत महिलांनी पुरुषांच्या मक्तेदारीला आव्हान दिले आहे. मात्र त्या मोबदल्यात या महिलांच्या एकूणच सुरक्षेला आव्हान निर्माण झाले आहे. राजधानी असो वा कोणतेही महानगर. महिला सुरक्षेचा प्रश्‍न हा ऐरणीवरच राहीला आहे. अनेक महिला शिक्षित होवून मोठ्या हुद्यांवर जबाबदारी सांभाळत आहेत. मात्र तेथिल वातावरणात त्यांना सुरक्षितता लाभेलच याची आजही शाश्‍वती देता येत नाही. शिक्षित महिलांची ही अवस्था असेल, तर वर्षांनुवर्षे शिक्षणापासुन वंचित असणार्‍या आणि श्रमजीवी जीवन जगणार्‍या महिलांच्या वस्तुस्थितीविषयक आजही खरी माहीती मिळत नाही. भारतीय शेतीत शेतकर्‍यांबरोबरच महिला शेतकर्‍यांचे श्रम अधिक आहेत. शेतामधील निंदणी, खुरपणी, पेरणी, लावणी, कापणी, आदी शेतीविषयक कामे महिलांवरच अवलंबून आहेत. मात्र शेतीत आजही मालकी हक्क म्हणून महिलेला स्थान मिळत नाही. कायद्यानुसार आज शेतकर्‍याच्या सातबारा उतारावर त्याच्या पत्नीचेही नाव मालकी हक्कात लावण्याची तरतुद आहे. किंबहुना हा अधिकार आहे. परंतु याची अंमलबजावणी करण्यात आजही महसुल खात्याला फारसा रस नाही. देशातील वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये महिला कामगारांची संख्या प्रचंड प्रमाणात आहे. बांधकाम क्षेत्रात मदतनीस कामगार म्हणून तर महिलाचा अग्रणी असतात. त्यांना रोजगार देतांना बर्‍याच ठिकाणी पुरुषांच्या तुलनेत अल्प रोजगार दिला जातो. महिलांना शासकीय सेवेत असतांना मातृरजा म्हणून तरतूद आहे. पण  श्रमजीवी महिलांना अशा प्रकारचा कोणताही लाभ मिळत नाही. स्त्रीयांची अवस्था ही भारतीय समाजात केवळ स्त्री समाज पाहणे योग्य ठरणार नाही. तर वेगवेगळ्या समाज प्रवर्गातील स्त्रीयांची वस्तुस्थिती लक्षात घ्यावी लागेल. बहुजन समाजातील स्त्री ही प्रामुख्याने कष्टकरी आहे. त्या महिलांना अजूनही तिचे न्याय-हक्क मिळाले का ? महिला वर्गांमध्ये देखील भेद दिसून येतो. एक महिला विमान चालवते, एक महिला नौदलात, सैन्यात अधिकारी होेते, तर दुसरी महिला खेड्यात कष्टात खितपत पडते. त्यामुळे कष्टकरी महिलांना देखील त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्याची गरज आहे, शिवाय त्यांचे सामाजिक स्थान उंचावण्याचीही खरी गरज आहे.

COMMENTS