शेतकर्‍यांचा जीव टांगणीला

Homeताज्या बातम्यासंपादकीय

शेतकर्‍यांचा जीव टांगणीला

राज्यात ऑक्टोबर महिन्याचा मध्यावधी सुरु असून, या महिन्यात ऑक्टोबर हिट सर्वसामान्यांना अपेक्षित असते. त्यानंतर सुरु होतो, हिवाळा. दिवाळी म्हटले की ती,

दहशतवाद्यांचे स्लीपर सेल
हकनाक बळी !
महसूल तूट चिंताजनक

राज्यात ऑक्टोबर महिन्याचा मध्यावधी सुरु असून, या महिन्यात ऑक्टोबर हिट सर्वसामान्यांना अपेक्षित असते. त्यानंतर सुरु होतो, हिवाळा. दिवाळी म्हटले की ती, सकाळची अंगाला झोंबणारी थंडी. मात्र यंदा ऑक्टोबर महिन्याच्या मध्यावधीमध्ये देखील पाऊस सुरुच आहे. दररोजच्या पावसाने पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होतांना दिसून येत आहे. अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस पडत असल्यामुळे पावसाने नद्या, नाले तुडूंब भरून निघाले आहे. खरे तर असा पाऊस जुलै ऑगस्ट महिन्यात अपेक्षित असतो. मात्र यंदा खरीप हंगाम संपून रब्बी हंगाम प्रतीक्षेत असतांना, पावसाने जोरदार बॅटिंग सुरु केली आहे. आताच्या पावसाने रब्बी हंगामाला वेग येणार असून, पिकेदेखील चांगली येतील यात शंका नाही. मात्र खरीप हंगामातील पिकांचे मात्र नुकसान होतांना दिसून येत आहे.
शेतकर्‍यांनी खरीप हंगामासाठी खासगी सावकांराकडून मोठया प्रमाणावर पेरणी करण्यासाठी कर्ज घेतलेले आहे. अशावेळी पिकांची काढणी केल्यानंतर सावकारांचे कर्ज फेडायचे असा शेतकर्‍यांचा नेहमीचा शिरस्ता आहे. मात्र यंदा पीक पाण्याखाली असून, पाऊस कधी उघडेल सांगता येत नाही. पीके असेच पाण्याखाली राहिल्यास ते सडून जातील. पुन्हा शेतकरी मदतीची याचना करेल. तुटपुंजी मदत मिळेल किंवा मिळणार ही नाही. अशावेळी शेतीचे कर्ज फेडायचे, हा यक्षप्रश्‍न शेतकर्‍यांसमोर कायम आहे. सोयाबीन, कापूस, मुग, उडदाचे पीक चांगलेच जोमाने बहरून आले आहे. मात्र सातत्याने सुरु असलेल्या पावसामुळे, या पिकांचे देखील मोठया प्रमाणावर नुकसान होतांना दिसून येत आहे. परतीच्या पावसामुळे शेतकन्यांची तयार झालेली पिके पावसाच्या पाण्यात वाहून गेली. मुख्य पीक असलेल्या कांद्याचे शंभर टके नुकसान झाल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले आहे. तसेच मका, बाजरी, सोयाबीन या इतर पिकांनाही फटका बसला आहे. एकीकडे शेतकन्यांना कांद्याला योग्य भाव भाव मिळत नाही तर दुसरीकडे अतिवृष्टीमुळे कांद्याचे पीक पाण्याखाली गेले आहे. कांद्याचे उत्पादन करणार्‍या शेतकर्‍यांना कधी बाजारभाव मिळत नाही तर कधी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचा सामना करावा लागतो. शासनाने नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा करून तातडीने नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी आता शेतकर्‍यांकडून होत आहे. अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांच्या खरीप हंगामातील बाजरी, मका, कांदा, टमाटा, कांद्याचे रोप, कपाशी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन दिवाळीच्या शेतकर्‍यांचे नुकसान झाल्यामुळे आता दिवाळी कशी साजरी करावी अशी चिंता शेतकर्‍यांना लागून राहिली आहे. दरम्यान शासनाने पिक विमा बरोबरच शेतकर्‍यांना झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून सरसकट आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरी करतांना दिसून येत आहे. यंदा खरीप हंगामात सोयाबीन आणि कपाशीच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. उशिरा पेरणी आणि कडधान्याखालील क्षेत्र घटल्याने सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. उत्पादनातही वाढ होईल, अशी शक्यता शेतकर्‍यांना होती. कारण पीक चांगलेच बहरून आले होते. मात्र दररोजच्या पावसाने पीके पाण्यात गेली आहेत. पिके सडतांना दिसून येत आहे. शेतात पाणी साचल्याने सोयाबीनला सर्वाधिक फटका बसतो. त्यामुळे याचा फटका कापसाला आणि सोयाबीनला देखील बसतांना दिसून येत आहे. पावसामुळे कापसाचे भाव खाली आले आहे. गेल्या काही दिवसांत कापसाचे भाप 12-13 हजारांच्या पुढे असतांना, आता कापसाचे भाव 6-7 हजारांवर येऊन ठेपले आहे. राज्यात 7 ऑक्टोबरपर्यंत 100 पेरणी झाल्या असून, 1180.4 मि.मी. म्हणजेच सरासरीच्या 115.7 टक्के पाऊस झाला असून 143.10 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

COMMENTS