Homeताज्या बातम्या

नागरिकांच्या आरोग्याशी सुरू असलेला खेळ थांबणार कधी?; नांदेडमध्ये अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

नांदेड : अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) नवे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थ, निकृष्ट खाद्यतेल, दुग्ध

तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईचा राज्यभर धसका; अफवेनेच बाजारपेठा ओस, अवैध विक्रेत्यांमध्ये खळबळ
संगमनेरकर आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पाठीशी; अन्न व औषध प्रशासनातून बदली न करण्याची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
गुटखा-पानमसाला, खाद्यतेल अन् बेकरी उत्पादनांवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; नांदेड जिल्ह्यातील अनेक पेढ्या सील

नांदेड : अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) नवे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थ, निकृष्ट खाद्यतेल, दुग्धजन्य पदार्थ आणि बेकायदेशीर गुटखा विक्रेत्यांविरोधात तीव्र मोहीम सुरू केली आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यांत धडक कारवाया होत असताना, नांदेड जिल्ह्यात मात्र अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी नेमके काय करत आहेत? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यात नियमित तपासणी आणि कठोर कारवाईचा अभाव असल्याने भेसळखोरांचे मनोबल वाढल्याचा आरोप होत आहे.

नांदेड हे मराठवाड्यातील मोठे शैक्षणिक केंद्र असल्याने येथे हजारो विद्यार्थी खानावळींवर (मेस) अवलंबून आहेत. मात्र, अनेक खानावळी आणि हॉटेल्समध्ये कमी दर्जाचे उघडे तेल वापरणे, अन्नात सोड्याचा अतिरेक आणि अस्वच्छता यांमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. शहरातील काही नामांकित हॉटेल्स आणि बिर्याणी केंद्रांमध्ये एकदा वापरून काळेकुट्ट झालेले तेल पुन्हा वापरले जात असल्याच्या तक्रारी आहेत. बेकरींमधील शिळे अन्नपदार्थ, कृत्रिम दूध आणि रसायनांनी पिकवलेली फळे बाजारात सर्रास विकली जात असूनही स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही.

नागरिकांच्या मते, केवळ तक्रार आल्यावर कारवाई करण्याचे नाटक न करता बिर्याणी हॉटेल्स, बेकरी आणि किराणा दुकानांची अचानक व नियमित तपासणी होणे गरजेचे आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या राज्यव्यापी धडक मोहिमेच्या धर्तीवर नांदेड जिल्ह्यातही व्यापक मोहीम हाती घेऊन दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी आग्रही मागणी आता नांदेडकरांमधून होत आहे.

COMMENTS